नागपूर : शहरातून सहा महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण करून तेलंगणात पळ काढलेल्या जोडप्यासह तिघांना रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांना आज न्यायालयात हजर करून त्यांचा ११ जूनपर्यंत पीसीआर मिळवला.
सुनील उत्तम रुढे (वय ३२, रा. हिंगेवाडी, दिग्रस, जि. यवतमाळ), माया बाबूराव चव्हाण (वय २८, रा. चंद्रपूर), सुजाता लच्छया गाजलवार (वय ३०आसिफाबाद, तेलंगणा) असे अपहरण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
तेलंगणाच्या मंचेरिया येथील एका महिलेला बाळ हवे असल्याने हा सर्व प्रकार घडला. याबदल्याने त्या महिलेला सुजाताने मोठ्या रक्कमेची मागणी केली. त्यानुसार, आरोपी सुनील आणि मायाने नागपुरात येऊन बाळाचा शोध घेण्यास सुरुवात केली. भिक्षेकरी दाम्पत्य आणि त्यांचे सहा महिन्याचे बाळ नजरेस पडताच आरोपींनी त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांच्याकडून ते बाळ घेण्यास जबदस्ती केली. मात्र आपले बाळ देण्यास त्यांनी नकार दिला.
गुरुवारी पहाटे ४.१५ वाजता रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक चार वरून सहा महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण केले. दरम्यान, गुरुवारी सकाळी ६ वाजता बाळाच्या आईला जाग आली. घाबरलेल्या भिक्षेकरी महिलेने करून रेल्वे पोलिसांकडे बाळ चोरीला गेल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी बाळाचा शोध घेण्यास सुरुवात केली. ठाणेदार मनिषा काशिद यांच्या नेतृत्वात बाळाचे अपहरण करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी ४ पोलीस पथके तयार करण्यात आली.
आरोपी तेलंगणाच्या दिशेने गेल्याचे कळताच पोलिसांनी हालचाली सुरु केल्या. तेलंगणा पोलिसांच्या मदतीने आरोपी सुनील आणि मायाला चिमुकल्यासह आसिफाबादमध्ये पकडण्यात आले.मात्र ज्या महिलेला हे बाळ देणार होते त्या महिलेचा शोध पोलिसांना लागलेला नाही. तेलंगणा पोलिसांना त्या महिलेला शोधण्यास सुरुवात केली आहे.रेल्वे पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांचा ११ जूनपर्यंत पीसीआर घेण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.