पुणे : भारतात सध्या सुरू असलेल्या हिंदू-मुस्लिम वादामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी कोणत्याही विशिष्ट नेत्याचे नाव न घेता याबाबत भाष्य करत चिंता व्यक्त केली. पुण्यात गुरुवारी सहजीवन व्याख्यानमालेअंतर्गत डॉ. भागवत यांचे ‘विश्वगुरू भारत’ या विषयावर व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. मोहन भागवत हे गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेल्या मंदिर-मशिदीच्या वादावरून नाराज होते. राम मंदिरासारखा मुद्दा इतरत्र उपस्थित करू नका, असे आवाहन त्यांनी केले.देशात आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सामंजस्याने राहत आहोत. ही सदिच्छा जगापर्यंत पोहोचवायची असेल तर एक मॉडेल तयार करावे लागेल.
राम मंदिराच्या उभारणीनंतर नवीन ठिकाणी असेच मुद्दे उपस्थित करून ते हिंदू नेते होतील, असे काही लोकांना वाटते. हे मान्य नाही. ते म्हणाले की, राम मंदिराची निर्मिती झाली कारण हा सर्व हिंदूंच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. भारतीय प्राचीन, सनातन हिंदू राष्ट्राची उत्पत्ती धर्मतत्त्वातून, सत्यातून झाली आहे. सृष्टीचे विज्ञान जाणून जगाच्या कल्याणाची इच्छा ठेवून राष्ट्रनिर्मिती झाली आहे. हा इतिहास कोणी तरी फायद्यासाठी दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला तो आजही दडविला जात आहे. देशाची परंपरा शाश्वत आहे.
आमचेच खरे असे म्हणणारे आम्ही नाही. आम्ही सर्वांविषयी श्रद्धा ठेवणारे असलो तरी, आमच्या देवतांवर आक्रमण करून, अरेरावी करून कोणी मतांतर करणार असेल, तर ते चालणार नाही. बाहेरून आलेले काही लोक वर्चस्ववादासाठी आग्रही आहेत. मात्र, स्वतंत्र देशात राहायचे असताना वर्चस्ववादाची भाषा कशासाठी हवी,’ असा सवाल भागवत यांनी केली. अयोध्येतील राम मंदिर हिंदूंना द्यावे, असे ठरले होते, पण इंग्रजांना त्याची हवा मिळाली आणि त्यांनी दोन्ही समाजात दुरावा निर्माण केला. तेव्हापासून फुटीरतावादाची भावना अस्तित्वात आली. परिणामी पाकिस्तान अस्तित्वात आला. …तर वर्चस्ववादाची भाषा का वापरली जाते –
प्रत्येकजण स्वत:ला भारतीय समजत असेल तर वर्चस्ववादाची भाषा का वापरली जात आहे, असा सवाल भागवत यांनी केला. कोण अल्पसंख्याक आणि कोण बहुसंख्याक? इथे सगळे समान आहेत. प्रत्येकजण आपापल्या उपासना पद्धतीचे अनुसरण करू शकतो, ही या देशाची परंपरा आहे. गरज फक्त चांगल्या भावनेने जगण्याची आणि नियम-कायदे पाळण्याची आहे, असे देखील भागवत म्हणाले.
राम मंदिर निर्मिती झाली म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही-
धर्म हा प्राचीन असून धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झालीय. ती योग्यच आहे. परंतु, मंदिराची निर्मिती झाली म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही. तसंच भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामातून तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशयापोटी रोज एक नवीन प्रकरण काढून चालणार नाही. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी भाजप नेतृत्वाला उद्देशून हे विधान केल्याचे बोलले जात आहे.
हिंदू धर्म हा शाश्वत धर्म –
हिंदू धर्म हा शाश्वत धर्म असून या चिरंतन आणि सनातन धर्मातील आचार्य सेवाधर्माचं पालन करतात. हा सेवा धर्म म्हणजेच मानव धर्म आहे. सेवा करताना कायम प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा आपला स्वभाव असतो. दिखाव्यासाठी सेवा न करता ती निरंतर करत राहणारे सेवेची कामना करतात. सेवेचा धर्म सांभाळताना अतिवादी न होता त्याचा मध्यम मार्ग आपण देशकाल परिस्थितीनुसार स्वीकारायला हवा.
मानव धर्म हाच विश्वाचा धर्म असून तो सेवेतून प्रकट व्हावा.
अल्पसंख्यांकांची अवस्था लक्षात घेणं गरजेचे –
आपण विश्वशांतीसाठी घोषणा देतो. मात्र, इतरत्र अल्पसंख्यांकांची अवस्था काय? हे लक्षात घेणं गरजेचे आहे. पोट भरण्यासाठी आवश्यक ते केलंच पाहिजे. पण गृहस्थाश्रमापलीकडं आपल्याला जे-जे मिळाले ते आपण सेवा रूपाने दुप्पट द्यायला हवं. जग आपले प्रतिपालक आहे. उपभोगाची वस्तू नाही, असेही यावेळी मोहन भागवत म्हणाले.