Published On : Tue, Jun 25th, 2019

ती पार्सल नागपूर एैवजी वलसाळला

रेल्वेची पार्सल सेवा असुरक्षित, आंब्याच्या पेट्या फोडल्या, जीआरपी दाखविते आरपीएफकडे बोट अन् आरपीएफ पार्सलविभागाकडे

नागपूर: रेल्वेच्या पार्सल विभागाचे शुल्क भरून ग्राहक आपला माल नियोजित स्थळी पाठवितात. परंतु पाठविलेला माल ग्राहकांना मिळत नसेल तर आणि मिळालेच तर त्यातील काही लंपास झाले असतील तर… असाच काहीसा प्रकार नागपूर रेल्वे स्थानकाच्या पार्सल विभागात उघडकीस आला. सूरतवरून नागपुरात पाठविण्यात आलेल्या आंब्याच्या पेट्या नागपुरात उतरविल्याच नाही. त्या मालदा रेल्वे स्थानकावर पोहोचल्या.

परतीच्या प्रवासात गाडी आल्यानंतर नागपुरात पेट्या उतरविण्यात आल्या. मात्र, त्यातील दोन पेट्या फूटल्या होत्या. ७० किलो पैकी केवळ ५० किलो आंबेच ग्राहकाला मिळाले आहेत. मोठ्या विश्वासाने ग्राहक आपली पार्सल रेल्वेने पाठवितात. मात्र, रेल्वेच्या पार्सल विभागातच भोगळ कारभार असल्याने ग्राहकांच्या विश्वासाला तळा जात आहे. ही नित्याचीच बाब असली तरी या व्यवस्थेत दुरूस्ती करण्यात आली नाही.

मुळचे नागपुरचे आणि सध्या सुरतच्या बलसाळ येथे अभियंता या पदावर कार्यरत असलेले मंदार केळापूरे यांनी सुरतहून मालदा टाउन एक्सप्रेस (गाडी क्रमांक १३४२६)ने रेल्वेच्या पार्सल विभागातंर्गत ७० किलो आंबे सात पेटीत १६ जूनला नागपूरकडे रवाना केले. एका पेटीची किंमत ही दीड हजार रुपये आहे. १८ जूनला नागपूर स्टेशनवर पार्सल विभागाच्या वतीने या आंब्याच्या पेट्या उतरविणे अपेक्षित होते.

मात्र, पार्सल विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा माल उतरविण्यातच आला नाही. त्यामुळे हे पार्सल मालद्याला गेले. ज्यावेळी ही गाडी परत नागपूरला आली तेव्हा गाडीक्रमांक १३४२५ मधून रविवार २३ जूनला सायंकाळी ४ वाजता हे पार्सल उतरविण्यात आले. ज्यावेळी हे पार्सल नागपूरात उतरविले, तेव्हा या सात पेट्यापैकी एक पेटी पुर्णत: रिकामी होती. तर एका पेटीतील आंबे अध्यार्हून गायब होते. तर उर्वरीत पाच पेट्यापैकी दोन पेट्या पुर्णत: चपकलेल्या स्थितीत होत्या. एवढेच नव्हे तर ७० किलोचे पार्सल हे नागपूर स्थानकावर ५० किलोच भरले. या प्रकरणी राहुल केळापूरे (रा. प्रतापनगर) यांनी मुख्य पार्सल पर्यवेक्षक एस. एम. बालेकर यांच्याकडे आज सोमवारी तक्रार नोंदविली आहे.


तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ
रेल्वेच्या पार्सल विभागातून आंब्याच्या सात पेटीपैकी एक पेटी रिकामी भेटली तर दुसºया पेटीतील अध्यार्हून अधिक आंबे गायब होती. यासंदर्भात लोहमार्ग पोलिसांनी आरपीएफकडे बोट दाखविले. तर आरपीएफने पार्सल विभागाच्या मुख्य अधिकाºयांकडे तक्रार नोंदवायची असे उत्तर दिले. ज्या विभागातून पार्सलची चोरी होते त्यांनाच तक्रार द्यायची हा संपुर्ण प्रकारच संशयास्पद असल्याचे दिसून आले.

पार्सलची नोंद नाही
सुरतवरुन नागपूरला कोणते पार्सल पाठविले जाते याची नोंद नागपूर विभागाकडे नसल्याची माहीती मुख्य पार्सल पर्यवेक्षक एस. एम. बालेकर यांनी दिली. शिवाय पार्सलच्या डब्यात मोठ्या प्रमाणात माल असतो, आणि गाडी केवळ पाच ते दहा मिनिटे स्थानकावर थांबते. त्यामुळे त्या डब्यातून सर्व पार्सल खाली उतरविणे कठीण होते.