मालवण -राज्यातील आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी वेग घेत असताना, कोकणातील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मालवण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला रामराम ठोकत थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपाचे नव नियुक्त प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील प्रभावशाली नेते रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हे नेते व कार्यकर्ते भाजपात दाखल झाले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे गटासाठी आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
भाजपात प्रवेश का?
पक्षप्रवेश केलेल्या नेत्यांनी स्पष्ट सांगितले की, “गेल्या अडीच वर्षांत पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केलेले काम हे पक्षपात न करता सर्वसामान्यांसाठी होते. आम्हाला कधीच विरोधी पक्षासारखी वागणूक मिळाली नाही. मालवण हे पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे शहर आहे. त्याचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणूनच आम्ही भाजपात प्रवेश केला आहे.”
राजकीय भूकंपाची शक्यता
गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटातील कोकणातील अनेक महत्त्वाचे नेते भाजपात किंवा शिंदे गटात प्रवेश करत आहेत. विशेषतः भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून कोकणात भाजपची पकड वाढत चालली आहे. मालवणमधील या ताज्या पक्षबदलांमुळे आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटासाठी कोकण हे नेहमीच बालेकिल्ला मानले जात होते. मात्र आता तिथेही गळती वाढल्याने पक्षाला संघटनात्मक पातळीवर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या घडामोडींचा आगामी स्थानिक निवडणुकांवर निश्चितच परिणाम होणार, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.