नागपूर : सिगारेटप्रमाणे आता समोसा आणि जलेबी खाणाऱ्यांनाही आरोग्याचा इशारा दिला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानंतर एम्स नागपूरकडून शहरातील विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे साखर व चरबीचे प्रमाण दर्शवणारे फलक लावण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.
लवकरच नागपूरमधील हॉटेल्स, स्टॉल्स, कॅन्टीन आदी ठिकाणी चमकदार चेतावनी फलक झळकणार असून, त्यात समोसा, जलेबीसारख्या लोकप्रिय पण आरोग्यास घातक ठरणाऱ्या खाद्यपदार्थांतील साखर आणि तेलाचे प्रमाण नमूद केले जाईल.
मुलभूत हेतू – आरोग्य जागरूकता-
या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना त्यांच्या रोजच्या खाण्याच्या सवयींबाबत जागरूक करणे हा आहे. वाढत्या मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचा मुकाबला करण्यासाठी सरकारने या फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नव्या धोक्याची घंटा,डॉक्टरांचा इशारा –
कार्डियॉलॉजिस्ट डॉ. अमर अमाले यांनी म्हटले की, “साखर आणि चरबी ही आधुनिक काळातील नव्या तंबाखूप्रमाणे धोकादायक आहेत. सिगारेटप्रमाणे अन्नपदार्थांवरही आरोग्याविषयी चेतावणी असावी, ही काळाची गरज आहे.
एम्स नागपूरच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, ही संकल्पना केवळ नागपूरपुरती मर्यादित न राहता संपूर्ण देशभर पसरवली जाण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी घेतलं भान तरच मोहीम यशस्वी-
समोसा, जलेबीसारखे पदार्थ केवळ चवदार नाही, तर आरोग्यास अपायकारकही असू शकतात, हे जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न या मोहिमेमुळे होणार आहे. हे फलक लोकांना नुसतं भान देणार नाहीत, तर त्यांच्या खाण्याच्या सवयींवरही परिणाम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.