Published On : Mon, Jul 22nd, 2019

आव्हानाचे रुपांतर संधीत करणे ही यशस्वी नेतृत्वाची कसोटी

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर: जीवनात संघर्ष करुन सकारात्मक स्वभाव, जलद निर्णय क्षमता व सांघिक प्रयत्नांद्वारे यश संपादन करता येते. आव्हानाचे रुपांतर संधीत करणे ही यशस्वी नेतृत्वाची कसोटी ठरते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज नागपूर ये‍थे केले. हॉटेल सेंटर पॉंईंट येथे सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘सकाळ एक्सलेन्स अवार्ड 2019’ या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार , मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, सुप्रसिद्‌ध अभिनेत्री सायली पाटील, सकाळ नागपूर आवृत्तीचे संपादक शैलेश पांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त पुष्कळ व्यक्तींच्या सामाजिक कार्यांचा परिचय आपणास आहे. अशा कर्तृत्व व बुद्‌धीमत्तेला सन्मानित करण्यासाठी अशा पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन प्रशंसनीय आहे. सन्मान मिळाल्यावर मात्र समाधानी न राहता शालिनता व नम्रपणा अंगीकरुन जोमाने कार्य करत रहावे, असे मत श्री. नितीन गडकरी यांनी यावेळी मांडले.

आपल्या क्षेत्रात सामाजिक कार्यासह जिद्दीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणा-या कर्तृत्ववान व्यक्तींना सकाळ एक्सलेन्स अवार्ड 2019 ने सन्मानित केले जात असून नागपूरसह राज्यातील 30 शहारांतही अशाच प्रकारचे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले जात असल्याचे सकाळ नागपूर आवृत्तीचे संपादक शैलेश पांडे यांनी याप्रसंगी सांगितले.

शुन्यापासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करुन आपले कर्तृत्व सिद्‌ध करणा-या पुरस्कार प्राप्त मातब्बर व्यक्तींकडून नव्या पीढीने खूप शिकण्यासारखे आहे, असे विचार सुप्रसिद्‌ध अभिनेत्री सायली पाटील यांनी व्यक्त केले.

या सोहळ्यात सुमारे 47 पुरस्कार प्राप्तकर्त्यांना शिक्षण, वैद्यकीय, कृषी, सहकार व इतर सामाजिक कार्यांच्या श्रेणीमधील सकाळ एक्सलेन्स अवार्ड 2019 चे वितरण मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास सकाळ माध्यम समूहाचे पदाधिकारी, पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे आप्त स्वकीय उपस्थित होते.