नागपूर : शहरातील संघर्ष नगर चौकात सोमवार, १६ जून रोजी रात्री १०.२० वाजताच्या सुमारास भीषण साखळी अपघात झाला. भरधाव वेगातील कंटेनरने सिग्नलवर थांबलेल्या चार वाहनांना मागून जोरदार धडक दिल्याने तिघे गंभीर जखमी झाले असून चार वाहनांचे एकूण अंदाजे सव्वा चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर सुरेशराव गावंडे (वय २९) हे आपली वोल्सवॅगन पोलो (MH-04/GJ-4980) गाडी घेऊन सिग्नलवर थांबले असताना, पांढऱ्या रंगाच्या कंटेनर (MH-40/AK-3135) ने त्यांच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे पोलोसमोर असलेल्या टाटा एस (MH-34/BZ-7765), टाटा पंच (MH-49/BR-7877) आणि किया कार्निव्हल (MH-49/BW-5372) या वाहनांनाही मोठा धक्का बसला.
या अपघातात टाटा एस गाडीतील जयेंद्र धनराज कावरे (वय ३५) यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या पत्नी तेजस्विनी (वय ३०) आणि सहा वर्षीय मुलगी माही हिला डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर मार लागला आहे. सर्व जखमींना राधाकृष्ण हॉस्पिटल, नागपूर येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातात सहभागी असलेल्या चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वोल्सवॅगन पोलो, टाटा एस, टाटा पंच आणि किया कार्निव्हल या गाड्यांचे हेडलाईट्स, डोअर्स, बोनट, बंपर, व्हील्स आदी भागांचे तुकडे झाल्याची माहिती आहे. एकूण नुकसानाची रक्कम सुमारे ₹४.५० लाखांच्या घरात असल्याचा अंदाज आहे.
अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला. मात्र, त्याच्यासोबत असलेला क्लिनर घटनास्थळी उपस्थित होता आणि तो मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. वाठोडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असले तरी काही वेळेनंतर सोडून दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मिथुन नायर यांनी केला आहे.
“पोलिसांची कार्यपद्धती संशयास्पद”
मयूर गावंडे याचा मित्र मिथुन नायर यांनी ‘नागपूर टुडे’ शी बोलताना सांगितले की, “हा अपघात इतका मोठा असूनही संबंधित पोलिसांनी कंटेनर चालकाला पकडण्याऐवजी त्याच्या क्लिनरला सोडून दिले. त्यावेळी तो पूर्णपणे नशेत होता.” तसेच, त्यांनी पोलिसांकडे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मागितले असता, पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
वाठोडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माधव गुंडेकर यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे मत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे नागपूर शहरात वाहतूक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. दररोज होणाऱ्या अपघातांमुळे नागपूरकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.