नागपूर – नंदनवन परिसरात कबाडीत झोपलेल्या वृद्धाचा निर्घृण खून करून पसार झालेल्या आरोपीस अखेर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गावातून नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी आकाश योगेश नारनवरे (वय २३, रा. इंदिरानगर, तुमसर, भंडारा) याच्यावर पूर्वीपासूनच खून, चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असून तो एका सिक्युरिटी एजन्सीत गार्ड म्हणून काम करीत होता.
नागपूरच्या खरबी रिंग रोडवरील कबाडीत झोपलेल्या ६० वर्षीय अब्दुल रहीम पेख हुसेन यांची दिनांक १३ जूनच्या रात्री डोक्यात फावड्याने सात वार करून हत्या करण्यात आली होती. हा प्रकार सुरुवातीला ‘ब्लाइंड मर्डर’ म्हणून नोंदवला गेला होता. घटनास्थळाजवळील सिसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि पोलिसांची शिताफीमुळे आरोपीची ओळख पटवण्यात आली.
२०० सिसीटीव्ही क्लिप्सचा बारकाईने अभ्यास
तपासादरम्यान पोलिसांनी जवळपास २०० सिसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभ्यास करून आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेतला. सीसीटीव्हीत आरोपी सिक्युरिटी गार्डच्या पोशाखात दिसत होता व तो फॉर्च्यूनर गाडीने घटनास्थळावरून पसार झाल्याचे निदर्शनास आले. यावरून पोलिसांनी नागपूरातील विविध सिक्युरिटी एजन्सी, युनिफॉर्म पुरवणारे टेलर्स, तसेच फॉर्च्यूनर गाड्यांची माहिती घेतली. तपास अधिक खोलवर गेला आणि आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आले.
तिरोडा (गोंदिया) येथून अटक, गुन्ह्याची कबुली
गोपनीय माहितीच्या आधारे तिरोडा येथे सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून खून करताना वापरलेले शस्त्रही हस्तगत करण्यात आले आहे.
सिक्युरिटी एजन्सींवरही गुन्हा दाखल
विशेष म्हणजे, आरोपीला कोणतेही पोलीस व्हेरिफिकेशन न करता सिक्युरिटी गार्ड म्हणून कामावर ठेवण्यात आले होते. यावरून संबंधित सिक्युरिटी एजन्सीवरही महाराष्ट्र प्रायव्हेट सेक्युरिटी एजन्सीज नियमन अधिनियम २००५ , सेक्शन 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीसीपी रश्मिता राव यांचा इशारा
पत्रपरिषदेत डीसीपी रश्मिता राव यांनी नागरिकांना आवाहन केले की, “आपल्या सोसायटी, अपार्टमेंट किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सिक्युरिटी गार्ड्सकडे वैध लायसन्स व पोलीस व्हेरिफिकेशन आहे की नाही, याची खात्री करा. अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागू शकते.”
तपासपथकाची मेहनत
या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावण्यासाठी तपास पथकात पोलिस उपायुक्त रश्मिता राव, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी, पोनि जयवंत पाटील, पोउपनि प्रदीप काईट, प्रविण राऊत, दिनेश जुगनाहके, संजय वरवाडे, प्रदीप भदाडे, सोमेश्वर घुगल व संजय मुकादम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पुढील तपास सुरू
सदर आरोपी सध्या पीसीआर (पोलिस कोठडी) मध्ये असून, त्याच्याविरोधात आणखी काही गंभीर प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नंदनवन पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
नागपूरकरांनो, सावध राहा!
बोगस सिक्युरिटी एजन्सींविरोधात पोलिसांनी आघाडी घेतली असून, आता नागरिकांचीही जबाबदारी आहे की आपल्या परिसरात कोण काम करतंय, याची योग्य माहिती आणि पडताळणी असावी!
रविकांत कांबळे
नागपुर टुडे