मुंबई: भारताच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत सीमेवर तणावाची स्थिती निर्माण केली आहे. नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सतत हालचाली सुरू असून, मुंबईतही प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी तातडीची सुरक्षा बैठक बोलावली आहे.
राज्यात सर्वत्र सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, मुंबई पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. गर्दीची ठिकाणं, महत्त्वाची कार्यालयं, धार्मिक स्थळं आणि पर्यटनस्थळांवर कडक बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
रात्री ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न, भारताने दिले सडेतोड प्रत्युत्तर-
गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारताच्या विविध सीमावर्ती भागांवर ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. लडाखपासून गुजरातपर्यंत अनेक भागांवर ५० पेक्षा अधिक ड्रोन पाठवले गेले. मात्र, भारतीय सैन्याच्या तत्परतेमुळे हे सर्व ड्रोन आकाशातच निष्क्रिय करण्यात आले.
फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक-
सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांनी तातडीची बैठक घेतली असून, राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सज्जता ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
नागरिकांना आवाहन, अफवांपासून दूर राहा-
राज्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता, संशयास्पद हालचाली तात्काळ पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.