नागपूर: भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे नागपूर पोलिसांनी केरळमधील पत्रकार आणि विद्यार्थी कार्यकर्ता रेजाज एम. शिबा सिद्दीकीला अटक केली आहे. त्याच्यावर देशविरोधी आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कृतींचा आरोप आहे.
रेजाज सिद्दीकी ‘डेमोक्रेटिक स्टुडंट्स असोसिएशन’शी संबंधित असून ‘मक्तूब मीडिया’ आणि ‘दि ऑब्झर्व्हर पोस्ट’सारख्या माध्यमांवर विविध मुद्द्यांवर लेखन करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने ‘इंस्टाग्राम’वर भारतीय लष्कराच्या पाकिस्तानमधील ऑपरेशन सिंदूर आणि छत्तीसगढमधील ऑपरेशन कगार याविरोधात टीका करत सरकारच्या कारवायांना ‘मानवतेविरोधी’ म्हटलं होतं. त्याच्या या पोस्टमुळे देशद्रोह व सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मारवाडी चौकातील एका हॉटेलवर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. अटकेवेळी त्याच्याकडून 10 आक्षेपार्ह पुस्तके, माओवादी विचारसरणीचे साहित्य आणि इतर संशयित वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
रेजाज सध्या दिल्लीहून परतत असताना नागपूरमध्ये एका मित्राला भेटण्यासाठी थांबला होता. गुप्तचर यंत्रणा त्याच्यावर बराच काळ लक्ष ठेवून होत्या. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून नागपूर पोलिस व अँटी-नक्षल सेल त्याच्याकडे चौकशी करत आहेत.