नागपूर: शहराच्या ऐतिहासिक महाल भागात राजकीय धुमश्चक्री पुन्हा एकदा उफाळून आली आहे. सोमवारी सकाळी गांधीगेट परिसरात भाजपने काँग्रेसविरोधात आक्रमक आंदोलन छेडले. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला भ्रष्टाचारी ठरवत भाजप कार्यकर्ते शहर काँग्रेस कार्यालय ‘देवाडिया भवन’कडे कूच करू लागले. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांना मार्गातच अडवले.
या घटनेनंतर काँग्रेसचे कार्यकर्तेही मैदानात उतरले आणि दोन्ही गट आमनेसामने आल्याने वातावरणात प्रचंड तणाव निर्माण झाला. काही वेळ परिसरात जोरदार घोषणाबाजी झाली, परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर १७ मार्चला घडलेल्या आंदोलनाची आठवण ताजी झाली. तेव्हा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या संघटनांनी औरंगजेबाच्या कबर हटविण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी औरंगजेबाचा प्रतीकात्मक पुतळा आणि कबर जाळण्यात आली होती, ज्यामुळे परिसरात धार्मिक तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, काँग्रेसने काही दिवसांपूर्वी सद्भावना रॅली काढत शांततेचा संदेश दिला होता. मात्र भाजपने या रॅलीवर सडकून टीका करत काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आजच्या आंदोलनामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा अस्वस्थता पसरली असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.