नागपूर: एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत आहे, तर दुसरीकडे सोन्याचे दरही सातत्याने उच्चांक गाठत आहेत. सोमवारी, सोन्याने इतिहास रचला आहे. २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर प्रथमच एका लाख रुपयांच्या वर गेला आहे. कमजोर डॉलर आणि अमेरिका-चीन व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे वळल्याने सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
अखिल भारतीय सराफ संघाच्या माहितीनुसार, देशभरात सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. दिल्लीत सोमवारी संध्याकाळी ६.२८ वाजता १० ग्रॅम (एका तोळा) सोन्याचा दर १ लाख २५० रुपयांवर पोहोचला. नागपूरसह इतर प्रमुख शहरांतही सोन्याने १ लाख रुपयांचा टप्पा पार केला. सध्याच्या घडीला सोन्याच्या दरावर तीन टक्के जीएसटी लागू आहे.
काल घसरण, आज जोरदार उसळी-
शुक्रवारी सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली होती आणि तो दर ९८,१५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला होता. मात्र, सोमवारी सकाळी ९९,८०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत वाढल्यानंतर संध्याकाळी अचानक उसळी येत सोन्याने १ लाखाचा विक्रमी टप्पा ओलांडला.
स्थानिक बाजारातही तेजी-
स्थानिक बाजारात ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर १,६०० रुपयांनी वाढत ९९,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. मागील व्यवहार सत्रात तो ९७,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. मात्र सोमवारी बाजारात आलेल्या तेजीने सर्व विक्रम मोडीत काढले.