
नागपूर : महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा होण्याआधीच भाजपमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. प्रभाग क्रमांक १५ मधील भाजप कार्यकर्त्यांनी उमेदवारीवरून तीव्र नाराजी व्यक्त करत सोमवारी उघड आंदोलन केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची गाडी रोखण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रभाग १५ मधील कार्यकर्ते पक्षाकडून चर्चेत असलेल्या काही नावांना तीव्र विरोध करत आहेत. इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले नेते किंवा पूर्वी फारसे सक्रिय नसलेल्यांना तिकीट देण्याच्या हालचालींमुळे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जमले आणि जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपकडून अद्याप उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झालेली नसतानाही पक्षांतर्गत अस्वस्थता वाढताना दिसत आहे. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची गाडी अडवून ‘बाहेरच्यांना तिकीट नको’ अशी ठाम भूमिका मांडली.
आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, त्यांनी गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केले आहे. मात्र निवडणुकीच्या वेळी नवे चेहरे आणि पक्षांतर केलेल्यांनाच संधी दिली जाते, ही मोठी अन्यायकारक बाब असल्याचा आरोप त्यांनी केला. निष्ठावान आणि मेहनती कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच, पक्ष नेतृत्वाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आगामी महापालिका निवडणुकीत प्रचार न करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. भाजप नेतृत्व ही नाराजी कशी शमवते, याकडे आता राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.








