नागपूर : शिक्षणक्षेत्रात दीर्घ परंपरा लाभलेल्या सेवासदन शिक्षण संस्थेने शंभराव्या वर्षात पदार्पण केले असून, त्या निमित्ताने संस्थेचा शतसंवत्सरीय महोत्सव २ जानेवारी २०२६ ते २ जानेवारी २०२७ या कालावधीत विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या शताब्दी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सेवासदन शिक्षण संस्थेच्या सीताबर्डी, नागपूर येथील परिसरात होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीराम जन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष व आध्यात्मिक गुरू प.पू. गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती लाभणार आहे. याच प्रसंगी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थेला स्व. रमाबाई रानडे स्मृती शिक्षण–प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
शतकमहोत्सवी वर्षातील हा प्रतिष्ठित पुरस्कार यंदा ह.भ.प. वैकुंठवासी श्री आप्पाजी महाराज वारकरी विद्यापीठ, कुन्हा (बहिरम), तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती यांना जाहीर करण्यात आला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या कुन्हा गावात २०२२ साली सुरू झालेल्या या ज्ञानपीठामध्ये आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान शिक्षणासोबतच वारकरी संप्रदायाचे संस्कार, परंपरा व मूल्यांचे शिक्षण दिले जाते. संगणक शिक्षण घेतानाच टाळ–मृदंगाच्या तालावर भक्तीभावाने संस्कार जपणारी पिढी घडविण्याचे कार्य या संस्थेमार्फत केले जात असून, या अनोख्या व प्रेरणादायी कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
शताब्दी महोत्सवानिमित्त सेवासदन शिक्षण संस्थेतर्फे रमाबाई रानडे स्मृती द्विदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. गीता परिवारचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांची दोन व्याख्याने या अंतर्गत होणार आहेत. शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता ‘शिक्षणातील समत्वयोग’ या विषयावर एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईच्या कुलगुरू मा. डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली पहिले व्याख्यान होईल. तर रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता ‘जानो गीता – बनो विजेता’ या विषयावर प्लास्टो टँकचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
शताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर्षभर सेवासदन शिक्षण संस्थेतर्फे शिक्षणाची वारी, डी.एड्च्या माजी विद्यार्थ्यांचा ‘माहेर’ मेळावा, शिक्षक विकास कार्यशाळा, विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, पालकांशी संवाद, राष्ट्रीय परिषद, देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
ही माहिती संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कांचन गडकरी आणि सचिव श्रीमती वासंती भागवत यांनी दिली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेस स्वागत समितीचे कार्याध्यक्ष श्री. बापू भागवत, सचिव डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.









