Published On : Thu, Feb 27th, 2020

दहा जनावरे मालकांविरुद्ध गुन्हे दाखल

मनपा आयुक्तांनी घेतली गंभीर दखल


नागपूर : नागपूर महानगरपालिका हद्दीत शहरातील विविध भागात मोकाट जनावरे सोडून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात आता मनपाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत बुधवारी (ता. २६) मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिस ठाण्यात पाच व यापूर्वी केलेल्या तक्रारीच्या आधारे पाच अशा एकूण दहा जनावरे मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रहदारीला अडथळा निर्माण करणा-या जनावर मालकांविरूद्ध कारवाईचा विषय मनपा आयुक्तांनी गंभीररित्या घेतला असून जनावर मालकांना आपले जनावरे मोकाट न सोडण्याचे आवाहन महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे.

शहरातील बाजारांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरे आढळून येत असल्यामुळे बाजाराच्या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे.

Advertisement

गीता गणेश सहारे, रा. इमामवाडा रोड, गुजरवाडी, अजमत अमनउल्ला खान, रा. लोधीपुरा बजेरिया, फिरोज नूर खान रा. लोधीपुरा हज हाऊस, गणेश नत्थुजी सहारे, इमामवाडा रोड, गुजरवाडी, सतीश शर्मा रा. सुभाष रोड, अग्याराम देवी रोड ही गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहे. ह्या सर्व लोकांनी त्यांची जनावरे कॉटन मार्केट परिसरात मोकाट सोडली होती. नागपूर महानगरपालिकेच्या पथकाद्वारे १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान मोकाट जनावरांना पकडण्याची कार्यवाही करण्यात आली होती. संबंधित मालकांच्या जनावरांना पकडून मनपाच्या पथकाने बंदिस्त केले होते. या कारवाईनंतर जनावरांच्या मालकांनी त्यांना सोडविले. जनावर मालकांद्वारे जनावरे मोकाट सोडण्यात आल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला, यामुळे अपघाताची शक्यताही बळावली होती. यासंदर्भात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यात मनपाने केलेल्या कारवाईची माहिती देत २५ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. जनावर मालकांवर मुंबई पोलिस कायद्यातील कलम ९० (अ), १०२, ११७ तसेच इतर प्रचलित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती करण्यात आली होती.

या तक्रारीच्या आधारे गणेशपेठ पोलिसांनी संबंधित जनावर मालकांवर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने डॉ. गजेंद्र महल्ले यांनी १७ फेब्रुवारी रोजी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पाच जणांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर राहू नये, यासाठी मनपातर्फे वेळोवेळी सूचना देण्यात येते. मात्र, तरीही जनावर मालकांकडून दुर्लक्ष केल्या जाते आणि त्यांच्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. हे टाळण्यासाठी मनपा आता कडक पावले उचलत आहे. जनावर मालकांनी शहराबाहेर गोठे बांधावीत, असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात आले असून मोकाट जनावरांना बंदिस्त करण्याची मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून ती अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement