Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Feb 27th, 2020

  राज्य शासनाकडून भूसंपादनाचा ३७१ कोटींचा निधी अप्राप्त तात्काळ पाठपुरावा करा – महापौर

  नागपूर : नागपूर शहरातील पाच रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी रस्ते मोकळे करण्याची जबाबदारी महानगरपालिकेकडे आहे. मात्र, त्यातील बाधितांना द्यावयाच्या रक्कमेपैकी ७० टक्के रक्कम शासनाकडून अपेक्षित आहे. महापालिका यासाठी एकूण रक्कमेच्या ३० टक्के रक्कम देणार होती. मात्र, त्यापेक्षा अधिक रक्कम नागपूर महापालिकेने खर्च केली आहे. शासनाकडून अद्याप ३७१.८३५ कोटींचा निधी अप्राप्त असून त्यासाठी मनपा प्रशासनाने तातडीने पावले उचलावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

  महापौर संदीप जोशी यांच्या गांधीबाग झोन येथील जनता दरबारात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला महापौर संदीप जोशी यांच्यासह माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, स्थापत्य समितीचे सभापती अभय गोटेकर, उपसभापती किशोर वानखेडे, गांधीबाग झोनच्या सभापती वंदना यंगटवार, उपायुक्त महेश मोराणे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, नगररचनाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेश राहाटे, स्थावर अधिकारी राजेश अंबारे, सहायक आयुक्त अशोक पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, मनपाचे माजी स्थायी समिती सभापती रवींद्र पैगवार, सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

  शहरातील केळीबाग रोड, पारडी रोड, जुना भंडारा रोड, रामजी पहेलवान मार्ग, वर्धा रोड-अजनी-सोमलवाडा या रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामांची प्रक्रिया सुरू आहे. हे सर्व मार्ग मोकळे करण्याकरिता एकूण ६४२.०५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यापैकी राज्य शासन ७० टक्के अर्थात ४४९.४३५ कोटी इतका निधी देणार असून नागपूर महानगरपालिकेचा वाटा ३० टक्के अर्थात १९२.६१५ कोटी इतका आहे. रस्ता रुंदीकरणाचे कार्य युद्धपातळीवर करून नागरिकांना होणारा त्रास लवकरात लवकर कमी व्हावा, यासाठी नागपूर महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहे. नागपूर महानगरपालिकेने यासाठी अपेक्षित ३० टक्क्यांच्या वर खर्च केला असून आतापर्यंत ही रक्कम १९२.६१५ च्या तुलनेत २५६.०२ कोटींवर गेलेली आहे.

  शासनाकडून आवश्यक ४४९.४३५ कोटी निधीच्या तुलनेत आतापर्यंत शासनाने केवळ ७७.६० कोटी इतकाच निधी मनपाकडे वळता केला आहे. अर्थात शासनाकडून अद्यापही ३७१.८३५ कोटी निधी अप्राप्त आहे. हा निधी आला नसल्यामुळे रुंदीकरणाच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. नागपूर महानगरपालिकेने जवळपास त्यासाठीच्या सर्वच प्रक्रिया पूर्ण केल्या असून पुढील कार्यवाहीसाठी निधीची वाट बघत आहे. यासाठी आता मनपा आयुक्त आणि प्रशासनाने तातडीने कार्यवाही करीत शासनाकडे पाठपुरावा कराव व लवकरात लवकर शासनाकडून हा निधी खेचून आणावा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

  यावेळी महापौर संदीप जोशी यांनी पाचही रस्त्यासंदर्भात कार्यवाहीच्या सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला. निधीअभावी ज्या गोष्टी शक्य आहे, त्या कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी यावेळी दिले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145