Published On : Tue, Sep 12th, 2017

राज्यात तात्पुरते भारनियमन,महावितरणचे सहकार्याचे आवाहन

नागपूर: वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठयामध्ये अडचणी येत असल्यामुळे कालपासून राज्यात तात्पुरते भारनियमन करण्यात येत आहे. हे भारनियमन तात्पुरत्या स्वरुपाचे असून कमी वसुली व जास्त वीजहानी असलेल्या E, F व G गटांतील वाहिन्यांवर गरजेनुसार केले जात असून याकाळात ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीजनिर्मिती कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून सुमारे 7000 मे.वॉ., व मे. अदानी पॉवर कंपनीकडून 3085 मे.वॅ. वीज मिळणे अपेक्षित आहे. मात्र कोळशाची उपलब्धता व पुरवठ्यात आलेल्या अडचणींमुळे महानिर्मितीकडून सुमारे 4500 मे.वॅ. व मे. अदानी कंपनीकडून 1700 ते 2000 मे.वॅ. इतकीच वीज मिळत आहे. मे.एम्को व सिपत कडूनही 200 मे.वॅ. व 760 मे.वॅ. मिळण्याऐवजी अनुक्रमे 100 व 560 मे.वॅ .इतकीच वीज मिळत आहे.

विजेची उपलब्धतता वाढविण्यासाठी महावितरण सर्वोतोपरी प्रयत्न करत असून लघू निविदेद्वारे खुल्या बाजारातून 395 मे.वॅ वीज खरेदी केली आहे. ती वीज एक ते दोन दिवसांत उपलब्ध होईल. याशिवाय पॉवर एक्सचेंज मधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु याठिकाणीही वीज उपलब्ध नसून वीजही महागडी आहे.

विजेची उपलब्धतता होईपर्यंत जास्त वीजहानी असलेल्या E, F व G गटांतील वाहिन्यांवर आपत्कालिन व तात्पुरत्या स्वरुपाचे भारनियमन नाईलाजास्तव करावे लागत आहे.