Published On : Tue, Sep 12th, 2017

कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढण्याऐवजी सरकारने कायद्यात बदल करून भाजप नेत्यांना सर्व गुन्हे माफ करावेतः सावंत

Sachin Sawant

मुंबई: कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढण्याऐवजी सरकारने कायद्यात बदल करून भाजप नेत्यांना सर्व गुन्हे माफ करावेत अशी उपरोधिक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

राज्यातील भाजप आमदारांच्या गुन्हेगारी वर्तणुकीबद्दल बोलताना सावंत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना गुन्हे करण्याची खुली सूट दिली असल्याचे गेल्या काही दिवसांतल्या घटना पाहता दिसून येते. भाजप मंत्र्यांनी खुलेआम केलेले घोटाळे असो, महिलांवरती केलेले अत्याचार असो, खंडणी मागणे असो किंवा पोलिसांनी शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उचलणे असो या सर्व गुन्ह्यांची दखल प्रशासनामार्फत घेतली जात नाही. यातून या सरकारने कायदा व्यवस्थेची थट्टा चालवली असल्याचे दुर्देवी चित्र महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. सामान्य जनतेसाठी वेगळा न्याय आणि भाजपच्या नेते, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांसाठी वेगळा न्याय अशी सरकारची कार्यपध्दती आहे.

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आ. राजू तोडसाम यांची 20 लाख रू. खंडणी मागतानाची ध्वनीफीत संपूर्ण राज्याने ऐकली आहे, तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही. आ. अमित साटम यांनी केलेली अर्वाच्च शिवीगाळ व पोलिसांसमक्ष कायदा हातात घेऊन केलेली मारहाण ही संपूर्ण राज्याने पाहिली आहे. आ. मल्लिकार्जून रेंड्डींचे प्रकरण असो वा भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे यामध्ये कारवाई करण्याऐवजी ती प्रकरणे दाबून टाकली जात आहेत. गुंडाना राजरोसपणे पक्षात प्रवेश देऊन त्यांना सरकारी पाठबळ दिले जात आहे. भाजप सरकारचा कारभार हा दिवसेंदिवस अधिक ओंगाळवाणा होत चाललेला आहे.

राजरोसपणे कायदा व्यवस्थेची धुळधाण उडवली जात आहे हे अतिशय दुर्देवी आहे. यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन केंद्रात आणि राज्यात त्यांचेच सरकार असल्याने कायद्यात बदल करून भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांना सर्व गुन्हे माफ करावेत आणि वाल्याचा वाल्मिकी करण्याच्या कार्यपध्दतीला कायदेशीर मान्यता द्यावी अशी उद्वेगजनक भावना व्यक्त करून काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाच्या या कार्यपध्दतीचा तीव्र विरोध करत आहे असे सावंत म्हणाले.

Advertisement
Advertisement