Published On : Tue, Jan 21st, 2020

भ्रष्टाचाराच्या विरोधात शिक्षकांनी केले धरणे आंदोलन: सोमवारी मान. शिक्षण मंत्री नामदार प्रा वर्षा गायकवाड यांच्यासमवेत बैठक

मुंबई: मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे आझाद मैदानात मुंबई विभागाचे भ्रष्टाचारी प्रभारी शिक्षण उपसंचालक श्री राजेन्द्र अहिरे यांना निलंबित करावे, त्यांच्या गैरकारभाराची चौकशी करावी, त्यांना पदोन्नती देण्यात येऊ नये तसेच शासनाने गेल्या वर्षी मान्य केलेल्या बाबींची- जुनी पेन्शन योजना लागू करणे, वाढीव पदांना मान्यता देणे, माहिती तंत्रज्ञान विषय अनुदानित करणे, आश्व़ासित प्रगती योजना लागू करणे याची पूर्तता करावी यासाठी धरणे धरले होते.

यासंदर्भात संघटनेने मान. शिक्षण मंत्री नामदार प्रा वर्षा गायकवाड यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारल्यानंतर सोमवारी यासंदर्भात बैठक घेऊन समस्या निराकरण केले जाईल असे सांगितले.

मुंबई शिक्षण उपसंचालकांच्या विरोधात संघटनेने यापुर्वी मान शिक्षण मंत्री, मान. शिक्षण सचिव, मान. शिक्षण आयुक्त, मान. शिक्षण संचालक यांच्या कडे अनेकवेळा तक्रारी केल्या असून वारंवार आंदोलनेही केली आहेत. ११ डिसेंबर २०१९ ला संघटनेने वाशी बोर्डावर मोर्चा नेल्यानंतर मा. शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्वच शिक्षणउपसंचालकांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश त्वरित काढले परंतु कोणतीही कार्यवाही केली नाही.

त्याचप्रमाणे शासनाकडून सुध्दा मान्य मागण्यांची पूर्तता होत नसल्याचे संघटनेला जाणवत आहे. वेगवेगळी माहिती पुन्हापुन्हा मागवणे, समिती स्थापन करणे अशाप्रकारे चालढकल चालू आहे व वर्षानुवर्षे हजारो शिक्षक उपाशीपोटी अध्यापन कार्य करीत आहेत.

बदललेल्या शासनाकडून अद्याप कोणतीही अनुकूल पावले उचलली जात नसल्याने संघटनेला आंदोलन करावे लागत आहे. शासनाने शिक्षक समस्यांबाबत गांभीर्याने विचार करावा व समस्यांचे त्वरित निराकरण करावे अन्यथा संघटनेला याहून तीव्र आंदोलन करावे लागेल व त्याची जबाबदारी शासनावर असेल असे संघटनेने त्यांना निवेदनाद्वारे सांगितले आहे.

शिष्टमंडळात प्रा.मुकुंद आंधळकर, प्रा् अमर सिंह, प्रा दीक्षित, प्रा खाडे व प्रा अतुल पाटील यांचा समावेश होता.