Published On : Tue, Jan 21st, 2020

महावितरणच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की, गुन्हा दाखल

Advertisement

वीज खांबावरून खाली उतरण्यास अडथळा आणला

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: थकबाकीदार वीज ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्याने चिडलेल्या ग्राहकाने महावितरणच्या पथकाला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. महावितरणच्या पथकाला धक्काबुक्की केली म्हणून वीज ग्राहकाच्या विरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महाल, किल्ला परिसरातील मो. अयुब खान सुजाद खान या वीज ग्राहकाने मागील एक वर्षांपासून वीज देयकाची रक्कम भरली नव्हती. या वीज ग्राहकाकडे १ लाख २९ हजार रुपयांची थकबाकी झाली होती. महावितरणकडून थकबाकीची रक्कम वसूल व्हावी यासाठी सतत पाठपुरावा सुरु होता. पण वीज ग्राहक मो. अयुब खान सुजाद खान दाद देत नव्हता.

महावितरणकडून थकबाकीची रक्कम न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची नोटिस अगोदर वाजवण्यात आली होती. आज महावितरणचे तुळशीबाग उप विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसन्न श्रीवास्तव, शुक्रवारी शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता मनिष वाकडे, तंत्रज्ञ मनीषा बोरकर, राकेश शिवणकर, दिलीप वैद्य, वसंत रामटेके, योगेंद्र मेश्राम, देवराव राहाटे हे किल्ला परिसरात थकबाकीदार वीज ग्राहकांकडून थकबाकीची रक्कम वसूल करीत होते. महावितरणकडून थकबाकीदार वीज ग्राहक मो. अयुब खान सुजाद खान याचा वीज पुरवठा खंडित केल्यावर रशीद खान आणि अन्य एका व्यक्तीने अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसन्न श्रीवास्तव यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच वीज पुरवठा खंडित करण्यासाठी वीज खांबावर चढलेल्या राकेश शिवणकर यांनाही वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी दबाव टाकू लागला. खाली उतरण्यास अडथळा निर्माण केला. या घटनेचे छायाचित्रण करण्यासही रशीद खान याने आडकाठी आणली.

वीज ग्राहकाच्या या कृत्याविरोधात महावितरणकडून कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. कोतवाली पोलिसांनी वीज ग्राहकाच्या विरोधात भादंवि ३५३,३३२,५०४, ५०६,३४ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.