Published On : Fri, Sep 6th, 2019

‘नवा भारत’ निर्माणात शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे : प्रमिलाताई मेढे

‘आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने मनपातील आठ शिक्षकांचा गौरव

नागपूर : प्रत्येक व्यक्तीतील दैवी गुणांचा विकास करणे, त्याचा उपयोग समाजाला करून देणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. आपल्याला चारित्र्याच्या दृष्टीने नवा वैभवसंपन्न भारत घडवायचा आहे. यात शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे नेतृत्व करतील असे विद्यार्थी घडविण्याचा संकल्प करा, असा उपदेश धंतोली येथील अहिल्यादेवी होळकर मंदिराच्या संचालिका राष्ट्रसेविका समितीच्या प्रमिलाताई मेढे यांनी दिला.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सन २०१८ आणि सन २०१९ या दोन्ही वर्षासाठी एकूण आठ शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. याप्रसंगी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. यावेळी शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगीता गिऱ्हे, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, बसपाच्या पक्षनेत्या वैशाली नारनवरे, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, आशीनगर झोन सभापती विरंका भिवगडे, नगरसेवक सुनील हिरणवार, सहायक शिक्षक अधिकारी कुसुम चापलेकर, संजय दिघोरे, राजेंद्र सुके, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रमिलाताई मेढे म्हणाल्या, समाजात ईश्वरापेक्षा श्रेष्ठ स्थान आई आणि शिक्षकांचे आहे. गुरुमुळे ईश्वराचं दर्शन होतं म्हणून आपल्या संस्कृती पहिले वंदन गुरुला केले जाते, इतके श्रेष्ठ स्थान गुरुला देण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांमधील सत्त्वाचा, दैवी गुणांचा विकास करणं हे शिक्षकांचं काम आहे. हे काम करीत पंतप्रधानांच्या स्वप्नातील नवा भारत घडवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर नंदा जिचकार यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करीत, आता खऱ्या अर्थाने शिक्षकांची जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले. कुठलाही पुरस्कार हा जबाबदारी वाढविणारा असतो. या पुरस्काराने आपल्यासोबतच अन्य शिक्षकांनीही प्रेरणा घ्यावी आणि पुढील वर्षी पुरस्कार देताना चढाओढ व्हावी, इतके चांगले शिक्षक या स्पर्धेच्या निमित्ताने समाजाला दिसायला हवे, असेही त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकातून शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी ‘आदर्श शिक्षक पुरस्कारा’मागील संकल्पना विषद केली. मनपातील शिक्षकांचे कार्य उत्तम आहे. बदलत्या काळानुसार आता आपणही बदल करीत अधिकाधिक विद्यार्थी मनपा शाळेत दाखल होतील, असा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार व अन्य मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला मालार्पण व नंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. महापौर नंदा जिचकार, प्रमिलाताई मेढे व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन २०१८ साठी पाच तर सन २०१९ साठी तीन शिक्षक-शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षिका वसुंधरा वैद्य यांनी केले. आभार क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी मानले.

आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी

सन २०१८ : अशोक चिरकुटराव बालपांडे (सहायक शिक्षक, जानकीनगर मराठी प्राथमिक शाळा), श्रीमती प्रिती प्रदीप भोयर (सहायक शिक्षिका, दुर्गानगर मराठी उच्च प्राथमिक शाळा), श्रीमती मधु चंद्रशेखर पराड (सहायक शिक्षिका, संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा), रामकृष्ण श्रावणजी गाढवे (सहायक शिक्षक, सुभाषनगर मराठी प्राथमिक शाळा), सूर्यकांत भास्करराव मंगरुळकर (कला शिक्षक, संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा).

सन २०१९ : श्रीमती विजया भूजंगराव ठाकरे (सहायक शिक्षिका, दुर्गानगर मराठी प्राथमिक शाळा), श्रीमती रत्ना नामदेवराव कालबुत (सहायक शिक्षिका, आजमशहा मराठी प्राथमिक शाळा), श्रीमती रंजना राम बांते (सहायक शिक्षिका, संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा).