Published On : Mon, Jun 11th, 2018

बदल्यांबाबत शिक्षक समाधानी – जिल्हा परिषदांच्या सीईओंची माहिती

Advertisement

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या शिक्षकांच्या बदल्यांबाबत त्या त्या जिल्ह्यातील साधारण ८५ ते ९५ टक्के शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या मागणीप्रमाणे झाल्याने ते संपूर्ण समाधानी आहेत, अशी माहिती आज राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या उर्वरित फक्त ५ ते १५ टक्के शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न येत्या दोन दिवसात सोडविण्यात येईल. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही संपूर्ण प्रक्रिया १४ जूनच्या आत पूर्ण करुन शाळा सुरु होण्याच्या आत सर्व शिक्षकांच्या पदस्थापना कराव्यात, असे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विविध जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.

राज्यात ग्रामीण भागात सुमारे दीड लाख शिक्षकांच्या त्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील या शिक्षक बदल्यांचा आढावा घेतला. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उपसचिव गिरीष भालेराव उपस्थित होते.

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ग्रामविकास विभागाने ऑनलाईन प्रणाली स्वीकारली आहे. त्यामुळे शिक्षक बदली प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप पूर्णत: थांबला आहे. इच्छुक शिक्षकांना अर्ज करताना बदली हवी असलेल्या ठिकाणांची ऑनलाईन माहिती भरावी लागते. त्याप्रमाणे यंदा राज्यातील जवळपास दीड लाख शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या मागणीप्रमाणे करण्यात आल्या. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडली. बदली प्रक्रियेतील गैरव्यवहार रोखला जाऊन शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. आज व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये विविध जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. अहमदनगर जिल्ह्यात सुमारे ९० टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात ९३ टक्के, धुळे ९० टक्के, गोंदिया ८५ टक्के, कोल्हापूर ९० टक्के, नाशिक ९० टक्के याप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या पसंतीप्रमाणे झाल्या असल्याची माहिती त्या त्या जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्येही हे प्रमाण ८५ ते ९५ टक्के इतके आहे. शिक्षकांनी या बदली प्रक्रियेवर संपूर्ण समाधान व्यक्त केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.

श्रीमती मुंडे म्हणाल्या की, काही कारणांमुळे ५ ते १५ टक्के शिक्षकांच्या बदल्या राहिल्या आहेत. आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सर्व जिल्ह्यातील अशा विस्थापित शिक्षकांचा आढावा घेण्यात आला. या शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न येत्या दोन दिवसात सोडविण्यात येईल. त्यांच्या बदल्यांचे आदेश दोन दिवसांत निर्गमित करण्यात येतील. ग्रामविकास विभाग यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा अंतर्गत बदल्या झालेल्या शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करण्यात यावे. तसेच हजर झालेल्या शिक्षकांना तातडीने सामावून घेण्यात यावे. इतर जिल्ह्यांमध्ये बदली झालेल्या शिक्षकांबाबतही याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. शाळा सुरु होण्याच्या पूर्वी सर्व शिक्षक आपापल्या जागी हजर व्हायला पाहिजेत, अशा स्पष्ट सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिल्या.