नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे ऑनलाईन कर भरणा करण्यासाठी मनपा वेबसाईट, माय नागपूर मोबाईल ॲप आणि व्हॉटसअपवरील माय नागपूर एनएमसी चॅटबॉट या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे नागरिकांमध्ये मालमत्ता कर भरण्याबाबत जनजागृती चांगली वाढली असून गेल्या तीन महिन्यात ऑनलाईन कर भरणामध्ये नागपूरकरांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ पर्यंत नागपूर शहरातील १ लाख ९२ हजार ३२४ मालमत्ता धारकांनी ८८ कोटी ८५ लाख रुपयांचा मालमत्ता कराचा भरणा केला. ऑनलाईन पद्धतीने ९६ हजार ९९३ करदात्यांनी ४९ कोटी ९२ लाख रुपयांचा कर जमा केला. तर ९५ हजार ३३१ मालमत्ता धारकांनी मनपा कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने एकून ३५ कोटी ९७ लाखाचा कर भरणा केला.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी करदात्यांसाठी कर सवलतीची योजना घोषित केली होती. ३० जूनपर्यंत ऑनलाईन कर भरणा करणाऱ्या करदात्यांना १५ टक्के सवलत तर कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने कर भरणाऱ्या १० टक्के सवलत देण्यात आली. याकरीता नागरिकांनी मनपा कार्यालयात न जाता अधिकाधिक ऑनलाईन पद्धतीने कर भरणा करावा यासाठी नागपूर महानगरपालिकेने करदात्यांना अधिकाअधिक प्रोत्साहन देण्यात आले आहे.
मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सुद्धा मालमत्ता कर वसुली अधिक वाढावी, व योजनांची अंमलबजावणी योग्य रितीने करण्यासाठी कर विभागाची आढावा बैठक घेतली होती. याशिवाय अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., यांनी सुद्धा झोननिहाय बैठका घेत तसेच काही मालमता धारकांच्या ठिकाणाही भेट देत ही योजना यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. मनपाच्या कर विभागातर्फे उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक झोन कार्यालय, काही उद्यानात, शाळांमध्ये, तर विविध वस्त्या मालमत्ता कर वसुलीचे विशेष शिबीरे आयोजित करण्यात आली होती.
याशिवाय महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर, माय नागपूर ॲप, तसेच माय नागपूर एनएमसी चॅटबॉट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मनपाच्या कर भरणा सेवावर यूपीन टाकून नागरीकांना आपली मालमत्ता कराची माहिती जाणून घेता येते. शिवाय ऑनलाईन पद्धतीने कर भरता येते. त्यामुळे मनपा कार्यालयात न जाता कर भरता येते. गर्दीपासून सुटका सुद्धा मिळते. अशा सहज आणि सोप्या सुविधामुळे मालमत्ता कर धारक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पेमेंटकडे आकर्षिंत झाले आहेत.
समाज माध्यमातून प्रचार
महानगरपालिकेने मालमत्ता कराचा भराणा करून सवलतीचा लाभ घ्याचा म्हणून शोले सिनेमातील गब्बर सिंग, खट्टा मिट्टामधील टिचकूलेचा आधार घेतला होता. समाज माध्यम, तसचे विविध झोन कार्यालय, विविध चौकात कर भरण्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती वाढावा याकरीता बॅनर सुद्धा लावण्यात आले होते. त्याचबरोबर वस्त्यावस्त्यांमध्ये फिरत्या वाहनांच्या माध्यमातून जनजागृती केली होती. तर कर भरणारा मी जबाबदार नागरीक अशी मोहिम समाज माध्यमातून चालविली होती. अशा जनजागती अभियानमुळे नागरीकांमध्ये मालमत्ता कर भरण्याबाबत अधिक जनजागृती पसरली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक वसुली
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मालमत्ता कर वसुलीत जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ३० जून २०२४ पर्यंत तीन महिन्यात ७३ कोटी १३ लाख रुपयांचा कर जमा झाला होता. यावर्षी मात्र यात २० टक्क्यांनी वाढ झाल्याने ८७ कोटी रुपयांचा पल्ला आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात गाठला आहे.
एकाच दिवशी ५ कोटी ८८ लाखांची वसुली
महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या सवलतीचा फायदा घेण्यासाठी करदात्यांनी अखेरच्या दिवशी अधिकाधिक फायदा घेतला. सवलतीच्या अखेरच्या दिवशी म्हणजे ३० जून २०२५ ला एकाच दिवशी महापालिकेच्या तिजोरीत ५ कोटी ८८ लाख ४९ हजार ३३३ रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला. अखेरच्या दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने कर भरण्यासाठी करदात्यांनी मुख्यालय व झोनल कार्यालयांमध्ये गर्दी केली होती. काही ठिकाणी ३० जून रोजी रात्री उशिरापर्यंत नागरिक कर भरत होते.
लक्ष्मीनगर झोन अव्वल
गेल्या तीन महिन्यात कर वसूल करण्यात लक्ष्मीनगर झोनने आघाडी घेतली आहे. या झोनमध्ये गेल्या तीन महिन्यात १३ कोटी ९० लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला. त्या खालोखाल हनुमाननगर झोन ११ कोटी ३७ लाख तर तिसऱ्या क्रमांकावर मंगळवारी झोन १० कोटी ८१ लाख रुपयांचा कर वसूल केला.
१ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ या तीन महिन्यात प्रत्येक झोनमध्ये झालेली वसुली खालीलप्रमाणे.
१. लक्ष्मीनगर झोन – १३ कोटी ९० लाख रुपये
२. धरमपेठ झोन – ९ कोटी ३३ लाख रुपये
३. हनुमाननगर झोन – ११ कोटी ३७ लाख रुपये
४. धंतोली झोन – ६ कोटी ७२ लाख रुपये
५. नेहरूनगर झोन – १० कोटी ७१ लाख रुपये
६. गांधीबाग झोन – ४ कोटी १० लाख रुपये
७. सतरंजीपुरा झोन – २ कोटी ९७ लाख रुपये
८. लकडगंज झोन – ९ कोटी ४३ लाख रुपये
९. आशीनगर झोन – ६ कोटी ५० लाख रुपये
१०. मंगळवारी झोन – १० कोटी ८१ लाख रुपये