Published On : Wed, Feb 3rd, 2021

वंदे मातरम् हेल्थ पोस्टसाठी टाटा ट्रस्टने सहकार्य करावे : महापौर दयाशंकर तिवारी

टाटा ट्रस्टच्या सहकार्याने मनपाच्या आरोग्य सेवेचा दर्जा वाढला :
टाटा ट्रस्टचे सीईओ श्रीनाथ नरसिम्हन यांची मनपाला भेट

नागपूर : नागपूर शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावी यासाठी मनपातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. या आरोग्य केंद्रांमधून नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात येत असते. मात्र मागील ३ वर्षामध्ये टाटा ट्रस्टच्या सहकार्याने मनपाच्या आरोग्य सुविधेचा दर्जा वाढला आहे. नागपूर शहरामध्ये ७५ ‘वंदे मातरम् हेल्थ पोस्ट’ तयार करण्याचा मानस आहे. या हेल्थ पोस्टला सुद्धा टाटा ट्रस्टने सहकार्य करावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी टाटा ट्रस्टचे सीईओ श्रीनाथ नरसिम्हन यांना केले आहे.

टाटा ट्रस्टचे सीईओ श्रीनाथ नरसिम्हन यांनी बुधवारी (ता.३) नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहामध्ये मनपाचे अधिकारी व पदाधिका-यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी टाटा ट्रस्टचे सीईओ श्रीनाथ नरसिम्हन यांचा मनपाचा मानाचा दुपट्टा व तुळशीरोप देउन सत्कार केला. याप्रसंगी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, नगरसेविका मंगला गवरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, टाटा ट्रस्टचे श्री. किरण पेटारे, डॉ. अमर नावकर आदी उपस्थित होते.


यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, गत तीन वर्षांपासून टाटा ट्रस्टच्या सहकार्याने मनपाची आरोग्य केंद्र अद्ययावत झालेली आहेत. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा टाटा ट्रस्टने नागपुरकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य दिले. आरोग्य सेवेला प्राधान्य देणा-या टाटा ट्रस्टचे मनपाला पुढेही सहकार्य अपेक्षित आहे. याशिवाय मनपातर्फे शहरातील ४० वर्ष वयावरील व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सुरूवातीला एकाच प्रभागामध्ये हे अभियान राबवून पुढे संपूर्ण शहरात ते राबविण्यात येईल. एकूणच शहरातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी पुढेही मनपाला टाटा ट्रस्टचे सहाकार्य हवे आहे. टाटा ट्रस्टचा मनपासोबतचा करार डिसेंबरमध्ये संपूष्टात आलेला आहे. तो पुढे आणखी तीन वर्षासाठी वाढविण्याचे आग्रह यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सीईओ श्रीनाथ नरसिम्हन यांना केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी टाटा ट्रस्टच्या कार्याची प्रसंशा केली. कोव्हिड संक्रमणाच्या प्रादुर्भावात मनपाच्या आरोग्य सेवेला टाटा ट्रस्टच्या सहकार्याने बळकटी मिळाली. शहरातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी तीन वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा ट्रस्ट नागपूरात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा फायदा मनपाला झाला. मनपाच्या स्थानिक स्तरावर उत्तम दर्जाच्या लॅब तयार झाल्या. पुढे दोन नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र तयार करण्यात येणार आहेत. शहरामध्ये ५० बेड्सचे हॉस्पीटल सुद्धा तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या सर्व कार्यामध्ये पुढे टाटा ट्रस्टचे सहकार्य अपेक्षित असून पुढील काळातही टाटा ट्रस्टने ते सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

टाटा ट्रस्टच्या मनपाचे २७ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहेत. या सर्व केंद्रांवर उत्तम सेवा नागरिकांना मिळत आहे. याबद्दल नागरिकही समाधान व्यक्त करीत आहेत. संकटाच्या काळातही टाटा ट्रस्टने मोठे सहकार्य केले असल्याची माहिती यावेळी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.

टाटा ट्रस्टचे सीईओ श्रीनाथ नरसिम्हन यांनी मनपातर्फे करण्यात आलेल्या सत्काराचे आभार मानले व आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, मनपाच्या आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणा-या टाटा ट्रस्टच्या कार्याबद्दल मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधान आहे. ही साथ पुढेही कायम राहावी यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्नशील आहोत. टाटा ट्रस्टने नेहमीच आरोग्याला प्राधान्य दिले आहे. नागरिकांची आरोग्यवर्धक जीवनशैली असावी यासाठी उपचारासह त्यांची संपूर्ण माहिती गोळा करण्यात यावी. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची माहिती मनपाकडे राहिल व पुढील उपचारही योग्यरित्या होउ शकेल. पुढे टाटा ट्रस्ट या दृष्टीनेही कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी टाटा ट्रस्टचे सीईओ श्रीनाथ नरसिम्हन यांनी मनपाच्या इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देउन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यावेळी उपस्थित होते. इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती गुप्ता व डॉ. वानकर यांनी केंद्रातील व्यवस्थेबाबत माहिती दिली.