| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Feb 3rd, 2021

  नागरिकांच्या तक्रारींसह संवादही व्हावा : महापौर दयाशंकर तिवारी

  नागरिकांच्या तक्रारींसंदर्भात महापौरांची सर्व विभागप्रमुखांसोबत बैठक

  नागपूर : अनेक मुलभूत गरजांच्या संदर्भात मनपाकडे नागरिकांच्या विविध माध्यमातून तक्रारी प्राप्त होतात. ऑनलाईनरित्या तसेच पदाधिका-यांना प्रत्यक्ष भेटून नागरिक आपल्या तक्रारी मांडत असतात. या तक्रारी वेळेत सोडविणे ही मनपाची जबाबदारी आहे. मात्र तक्रारी सोडवितानाच प्रशासनाने योग्य समन्वय साधून नागरिकांशी संवादही व्हावा, यादृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. नागरिकांना त्यांची तक्रारबददल माहिती भेटल्यास त्यांचे समाधान होईल, या दृष्टीने योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे.

  मनपाकडे प्राप्त होणा-या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने महापौरांनी बुधवारी (ता.३) सर्व विभागप्रमुखांसोबत बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, मिलींद मेश्राम, राजेश भगत, श्री. भेलावे, घनकचरा व्यवस्थापक डॉ.प्रदीप दासरवार, निगम सचिव डॉ.रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, कार्यकारी अभियंता अजय मानकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, हिवताप व हत्तीरोग अधिकारी दिपाली नासरे, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, अशोक पाटील, गणेश राठोड, हरीश राउत, विजय हुमने, सहायक आयुक्त किरण बगडे, सुषमा मांडगे, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.

  नागरिकांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी व त्या सोडवून घेण्यासाठी ‘राईट टू सर्व्हीस’ कायदा अंमलात आहे. या कायद्याचे पालन होणे अत्यावश्यक आहे. मनपाकडे विविध विभागात तसेच लोकप्रतिनिधींकडे येणा-या तक्रारींची एकत्रित नोंद होउन त्यातून किती तक्रारी सोडविण्यात आल्यात याची सविस्तर माहिती वेळोवेळी जनतेपर्यंत जाणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने कार्यवाही व्हावी. सोबतच ‘राईट टू सर्व्हीस’ कायद्याचे पालन व्हावे व सर्व तक्रारी वेळेत सोडल्या जाव्यात अशी सूचना यावेळी महापौरांनी केली.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145