Published On : Wed, Feb 3rd, 2021

उत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी

Advertisement

8 रुग्णांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात हलविले
पालकमंत्र्यांचे जबाबदार व्यक्तींवर कारवाईचे निर्देश

वर्धा :- वर्धा तालुक्याच्या भुगाव येथील उत्तम गलवा स्टील प्लँटमधील ब्लास्ट फरनेस काल 2 फेब्रुवारीला सायंकाळी वार्षिक देखभालीसाठी बंद करण्यात आला होता.

फरनेस पूर्णपणे बंद झाल्यावर फरनेस मधील राख बाहेर काढन्यासाठी 50 कामगार काम करीत होते. फरनेस मधील राख काढत असताना सकाळी 10 वाजताच्या सुमारास गरम हवे सोबत राखेचे कण एकदम अंगावर उडाल्यामुळे 38 लोक जखमी झालेत. यातील 28 व्यक्तींना सावंगी मेघे येथील विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर 10 व्यक्तींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कुणाचाही मृत्यू झाला नाही.

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात भरती रुग्णांची विचारपूस करून रुग्णांच्या नातेवाईकांना धीर दिला. रुग्णांना योग्य आणि चांगले उपचार मिळतील याची हमी जिल्हाधिकारी यांनी दिली. गरज पडल्यास रुग्णांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात विशेष वैद्यकीय उपचारासाठी पाठविण्यात येईल असेही त्यांनी नातेवाईकाना सांगितले. दरम्यान दुपारी गंभीर जखमा असलेल्या 8 व्यक्तींना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात विशेष उपचारासाठी पाठविण्यात आले आहे अशी माहिती उत्तम गलवाचे जनसंपर्क अधिकारी रमाकांत शर्मा यांनी दिली.

अपघातास जबाबदार असलेल्यांवर पालकमंत्री सुनील केदार यांचे कारवाईचे निर्देश
उत्तम गाल्वा मेटॅलिक्स या कंपनीमध्ये फरनेस मधील गरम हवा व राख अंगावर आल्यामुळे 38 कामगार जखमी झालेले आहेत.सदर अपघात गंभीर स्वरुपाचा असून या अपघातात जखमी झालेल्या कामगारांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील यांनी दिलेत.

तसेच सदर अपघाताची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कारखाने अधिनियम १९४८च्या तरतूदीनुसार, सरकारी कामगार अधिकारी यांचे मार्फत वेतन प्रदान नियम व कामगार विमा नियमाच्या अनुषंगाने आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्फत तपासणी करुन अपघातास जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले आहेत.