निःशुल्क एकदिवसीय शिबिरात 15 कुटुंबीयांनी घेतला एचएलए टायपिंग टेस्टिंग लाभ
सिकलसेल आजार हा एका विशिष्ट समुदायातील अनुवंशिक आजार आहे. जो आई-वडिलांपासून त्यांच्या अपत्यांना होऊन एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो. दुर्धर व जेनेटीक आजार असल्यामुळे सिकलसेल ग्रस्त रुग्णांना रक्त संक्रमणाची आवश्यकता अत्याधिक भासते. या आजराने ग्रस्त असलेल्या रूग्णांना दररोज संघर्ष करून आपले जिवन जगावे लागते. परंतु, अस्थिमज्जा प्रत्यारोपणाद्वारे (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) या रोगातून मुक्तता शक्य आहे. त्यामुळे बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटी) ही सिकलसेल ग्रस्तांसाठी संजिवनीच असल्याचे सुतोवाच दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हाॅस्पीटलमधील बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे संचालक तसेच बीएमटीचे फिजीशीयन म्हणून ख्यातिप्राप्त डॉ. गौरव खेरे यांनी केले.
स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरीटेबल ट्रस्ट (एसएमटीसीटी) आणि जीएमसीच्या माजी बालरोग प्रमुख डाॅ. दिप्ती जैन यांच्या विशेष प्रयत्नाने बोन मॅरो ट्रान्सप्लांट जनजागृती अभियान तसेच एकदिवसीय एचएलए टायपिंग टेस्टिंग शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त टाटा कॅपिटल हाईट्स, उंटखाना, मेडिकल चौक येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये आयोजित या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मेडिकलच्या माजी अधिष्ठाता विभावरी दाणी तर विशेष पाहुण्यांमध्ये भाजप शहराध्यक्ष आमदार प्रविण दटके, स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कुसूमताई तामगाडगे, डाॅ. श्रीराम काणे, मेडिकलच्या माजी बालरोग प्रमुख डाॅ. दिप्ती जैन, डाॅ. सुबोध गुप्ता, निखिल कुसुमगार, डाॅ. पलक कुसुमगार शाह, अजंता हाॅस्पिटलच्या स्नेहा गजभिये, आनंद मालकर, डाॅ. विकास चौधरी, तामगाडगे ट्रस्टचे सचिव निरगुसना ठमके, तामगाडगे ट्रस्टचे सल्लागार यशवंत बागडे यांची उपस्थिती होती.
तत्पूर्वी शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. पुढे बोलताना डाॅ. गौरव खेरे म्हणाले की, सिकलसेल हा अनुवांषिक आजार असला तरी सामूहिक संघर्षातूनच सिकलसेल मुक्ती शक्य आहे. गेल्या 7 वर्षांपासून जगात विविध ठिकाणी मी बोन मॅरो ट्रान्सप्लांटद्वारे रूग्णांना बरे केले आहे.
परंतु, बीएमटीबाबत देशात हवी त्या प्रमाणे जनजागृती झाली नाही. या प्रत्यारोपणात अधिक खर्च असला तरी कायमचे निदान सिकलसेल ग्रस्तांना मिळणार. स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरीटेबल ट्रस्ट तसेच डाॅ. दिप्ती जैन यांनी घेतलेल्या पुढकाराने नक्कीच विदर्भातील रूग्णांना याचा लाभ होणार असल्याचेही ते म्हणाले. सिकलसेल रोगावर नियंत्रणाकरिता समाजातील इतर व्यक्तींनासुद्धा तपासणी करण्यास प्रोत्साहित प्रत्येकांनी करावे. तसेच प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी एकदा तरी सिकसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही डाॅ. खेरे यांनी केले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी सुनियोचित मार्गदर्शन उपस्थित सिकलसेल ग्रस्तांना केले. कार्यक्रमाचे संचालन स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरीटेबल ट्रस्टचे व्यवस्थापक अमोल कांबळे तर आभार डाॅ. दिप्ती जैन यांनी मानले.
कुटुंबातील 4 ते 5 व्यक्तींची एचएलए टायपिंग टेस्टिंग तपासणी
पहिल्यांदाच नागपुरात बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे शिबीर घेण्यात आले असून यात रुग्णांची तपासणीसह रुग्णांचे सुनियोचित मार्गदर्शन करण्यात आले. बीएमटीमध्ये एका रूग्णाच्या कुटुंबातील 4 ते 5 व्यक्तींची एचएलए टायपिंग टेस्टिंग तपासणी करण्यात येते. यात जवळपास 10 ते 12 हजारांचा खर्च येतो. विशेष म्हणजे, महागडी असणाऱ्या एचएलए टायपिंग टेस्टिंग या शिबिरात रूग्णांसाठी निःशुल्क ठेण्यात आली. यावेळी 15 कुटुंबातील सदस्यांनी जवळपास पावने दोन लाख खर्च असलेल्या एचएलए टायपिंग टेस्टिंग सुविधेचा लाभ घेतला. शिबिरात विदर्भातून विविध ठिकाणाहून आलेल्या रूग्णांनी लाभ घेतला.