Published On : Fri, Feb 1st, 2019

प्रतिभावंत विद्यार्थिनींच्या भवितव्याला शिष्यवृत्तीमुळे बळ मिळेल : महापौर

Advertisement

मनपा शाळेतील २५ विद्यार्थिनींना ‘सच विजया शिष्यवृत्ती’ : सुभाष चंद्रा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अनेक प्रतिभावंत विद्यार्थी शिक्षण घेतात. आर्थिक परिस्थितीवर मात करून आपल्या यशाने नाव लौकीक करण्याचे सामर्थ्य आमच्या मनपा शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आहे. मागील काही वर्षांपासून दहावीच्या निकालामधून अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी हे सिद्धही केले. अशा प्रतिभावंत विद्यार्थिनींच्या शिक्षणात खंड पडू नये, कोणत्याही कारणामुळे त्यांची स्वप्न भंग पडू नयेत यासाठी सुभाष चंद्रा फाउंडेशनने हाती घेतलेला उपक्रम अत्यंत स्तूत्य आहे. फाउंडेशनच्या ‘सच विजया शिष्यवृत्ती’मुळे अनेक प्रतिभावंत विद्यार्थिनींच्या भवितव्याला बळ मिळेल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

सुभाष चंद्रा फाउंडेशनच्या वतीने ‘सच विजया शिष्यवृत्ती’ अंतर्गत गुरूवारी (ता. ३१) मनपा शाळेतील २५ प्रतिभावंत विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. सिव्‍हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार बोलत होत्या. यावेळी इसेल ग्रुपच्या शिक्षण सल्लागार नव्यता गोयंका, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, महावितरण नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, इसेल स्मार्ट यूटीलिटी नागपूरचे प्रमुख सोनल खुराना उपस्थित होते.

सुभाष चंद्रा फाउंडेशनच्या वतीने ‘सच विजया शिष्यवृत्ती’ अंतर्गत पायलट प्रोजेक्ट म्हणून हरियाणातील हिसार नंतर महाराष्ट्रातून नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे, हे विशेष. याप्रसंगी महापौर नंदा जिचकार व अन्य मान्यवरांच्या हस्ते मनपाच्या विविध शाळांमधून दहावीमध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थिनींना दोन वर्षासाठी प्रत्येकी २० हजार रूपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती विद्यार्थिनींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असून यावेळी सर्व विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

‘सच विजया शिष्यवृत्ती’ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींच्या निवडीबद्दल महापौर नंदा जिचकार यांनी सुभाष चंद्रा फाउंडेशनचे अभिनंदन केले. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनींना होत असलेली मदत त्यांना मोठे प्रोत्साहन ठरणार आहे. या एका उपक्रमामुळे या विद्यार्थिनींमध्ये आपणही समाजातील गरजूंसाठी काही करण्याची कर्तव्य भावना निर्माण होईल. भविष्यात आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मोठे पद मिळविणा-या या विद्यार्थिनी पुढे अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन ठरतील, असाही विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

मनपा शाळेकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टीकोन आजही फारसा बदलेला नाही. आर्थिकदृष्ट्या कमकुवत पालकच मनपा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवितात. आज मनपाच्या शाळांची स्थिती उत्तम स्थितीत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, हेच आमचे ध्येय आहे. आज शिक्षणासह विविध क्षेत्रामध्येही मनपा शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी आपला ठसा उमटवित आहेत. ‘सच विजया शिष्यवृत्ती’मुळे विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळणार असून पालकही मनपा शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पुढे येतील, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले, मनपा शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास करणे व आपल्या प्रत्येक विद्यार्थिनीला आत्मविश्वासाने सक्षम बनविणे हे आमचे कर्तव्य असून त्या दृष्टीने कार्य केले जात आहे. अभ्यासासोबतच प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपली छाप सोडली आहे. विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी उचलेलेल्या ‘सच विजया शिष्यवृत्ती’ हे स्तुत्य पाउल असून यामुळे मनपा शाळांचा दर्जा उंचावेल, असेही अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले.

इसेल ग्रुपच्या शिक्षण सल्लागार नव्यता गोयंका यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचे उद्देश स्पष्ट केले. नागपूर शहरातून जास्तीत जास्त प्रतिभावंत विद्यार्थिनींच्या भवितव्याला योग्य दिशा मिळावी यासाठी सातत्याने हा उपक्रम सुरू राहिल असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मालविका शर्मा यांनी केले तर आभार इसेल स्मार्ट यूटीलिटी नागपूरचे प्रमुख सोनल खुराना यांनी मानले.

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी :
दुर्गानगर मराठी माध्यमिक शाळा : दिव्या नरांजे, कोमल अलोने, हिताक्षी वंजारी, शितल रहाटे, आदिती दुरुगकर. गंजीपेठ उर्दु माध्यमिक शाळा : सानिया इराम शकील खान. गरीब नवाज उर्दु माध्यमिक शाळा : समरीन बानो सय्यद अहमद अंसारी. हाजी अब्दुल मजीद लिडर उर्दु हायस्कुल : उझमा तनझीम मो. सादीक. हंसापुरी हिंदी माध्यमिक शाळा : पूजा भालेकर. जयताळा मराठी उच्च माध्यमिक शाळा : शाहिस्ता शेख. एम.ए.के. आझाद उर्दु माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय : अल्फीया अंझुम अब्दुल रशीद, शमा परवीन मो. शाहीद, इकरा शाहरीस अबीद खान, उम्मुलकुरा मो. मुर्तझा. पन्नालाल देवडीया हिंदी माध्यमिक शाळा : अल्फीया कसार सय्यद सलीमुद्दीन, किरण सेलोकर. संजय नगर हिंदी माध्यमिक शाळा : किर्ती वर्मा, रागीनी नामदेव. शिवणगाव मराठी माध्यमिक शाळा : सुचित्रा राउत, श्वेता गणवीर. विद्या भूषण विद्यालय : रितीका पाटील. विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळा : भिवसाना धुर्वे, पूर्णीमा पटेल. डॉ. बी.आर. आंबेडकर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय : पूजा भगत, श्रावणी जाधव.