नागपूर, : गत सहा वर्षापासून नागपूर जिल्ह्यात सरासरी पावसापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडलेला आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम जिल्ह्यातील लहान-मोठ्या नाल्यांना पूर येणे, सकल भागात पाणी साचणे, शेत जमिनीची हाणी होणे, काही भागात पिकांचे नुकसान अशा अनेक बाबींवर होतो. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे आपण अनुभवले आहे. पूर्वानुभव लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी मान्सूनपूर्व उपाय योजनेबाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिले.
नियोजन भवन येथील आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, वैष्णवी बी, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे आदी उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यातील धरणांची सद्यास्थिती ही अभ्यासून घेतली पाहिजे. प्रत्येक लहान-मोठ्या धरणांची प्रत्यक्ष पाहणी करुन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑडीट करुन घेण्याचा सूचना जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिल्या. अतिवृष्टी, पूर सारख्या परिस्थितीला सामोरे जातांना ग्राम पंचायतीपासून तालुका आणि जिल्हा पातळीपर्यंत योग्य तो समन्वय असला पाहिजे. नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग यांनी आपल्याला नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडण्याच्यादृष्टीने आवश्यक असणारे आपल्याकडील साहित्य सुस्थितीत करुन ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
स्वयंचलित हवामान मापन केंद्र सुस्थितीत आहे किंवा कशी याची पाहणी करुन कृषी विभाग व महसूल विभागाने त्याबाबत अधिक काळजी घेतली पाहिजे. गत 5 वर्षात ज्या गावात अधिक पूर येत आहे तेथील कारणांचा अभ्यास करुन नियोजन केले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. सकल भागातील ज्या पुलावरुन पुलाचे पाणी वाहिले जाते अशी ठिकाणे निवडून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सूचना फलक लावण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी दिले.