मुंबई : नागपूर येथील शासकीय मुद्रणालयाच्या तसेच शहर पुरवठा कार्यालयाच्या काही जागा नागपूर विधानसभेच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असून, या जागांचे हस्तांतरण करावे. दोन्ही कार्यालयांनी पर्यायी जागा शोधून प्रस्ताव सादर करावा. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने त्याला अंतिम स्वरूप मिळेल. असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, महसूल उपसचिव अश्विनी यमगर, एमएसआयडीसीचे मुख्य अभियंता रणजीत हांडे, उद्योग विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, एमएसआयडीसीच्या कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम, एमएसआयडीसीचे व्यवस्थापक ब्रजेश दीक्षित आदी उपस्थित होते.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, शासकीय मुद्रणालय आणि पुरवठा विभागाला नवीन जागा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांनी पुढील दोन दिवसात जागांचा शोध घेऊन त्याबाबत प्रस्ताव सादर करावेत. शासकीय जागा असल्या तरी या गोडाऊनमधून शहरातील लोकांना कमीत कमी वेळेत धान्य पुरवठा होईल अशा पद्धतीची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. नवीन जागा पाहून त्या ठिकाणी बांधकाम करून दिल्यानंतरच संबंधित जागा ताब्यात घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
शासकीय मुद्रणालयाची काही जागा शिल्लक आहे. ही जागा विधानभवनासाठी आवश्यक आहे. तसेच शहर पुरवठा विभागाचे उर्वरित जागेमध्ये देखील बांधकाम करणे आवश्यक असल्याने या दोन्ही जागा शासनास देण्यात याव्यात, असा निर्णय महसूलमंत्री बावनकुळे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहमती नंतर हे निश्चित होणार आहे.
या दोन्ही जागा ताब्यात घेतल्यानंतर विधानभवनाच्या विस्तारीकरणामध्ये कोणतीही अडचणी येणार नाही. याच परिसरात असलेला झिरो माईलही विकसित करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक असणारे सर्व विभाग या इमारतींमध्ये तयार करण्यात येतील असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.