Published On : Fri, Sep 14th, 2018

योजनांचा लाभ घेवून युवकांनी जीवनात परिवर्तन घडवून आणावे – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी आणि तरुणांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. युवकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.

लोकराज्यच्या सामर्थ्य शिक्षणाचे, समृध्द महाराष्ट्राचे या शैक्षणिक क्रांतीचे जनक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज या विशेषांकाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

रविभवन सभागृह येथे आयोजित लोकराज्यच्या लोकार्पण सोहळयास महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, मुख्य अभियंता दिलीप घुगल, माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर आदी उपस्थित होते.

विविध महत्त्वाच्या निर्णयाची माहिती तसेच कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी लोकराज्य हे प्रभावी माध्यम आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या आदर्शाप्रमाणे शासनाने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले असून आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शिक्षण शुल्क प्रतिपुर्तीसारखी महत्वपूर्ण योजनेच्या माध्यमातून या घटकातील विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी आणि तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य दिले असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व प्रथम प्राथमिक शिक्षण मोफत आणि अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यामुळे 21 सप्टेंबर हा दिवस शैक्षणिक क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व सर्वांगिण प्रगती व्हावी यासाठी जिल्हयातील सर्व शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेवून प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज हा विशेषांक अत्यंत दर्जेदार व माहितीपूर्ण असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

प्रारंभी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी यांनी स्वागत केले तर जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी लोकराज्य मासिकाच्या वार्षिक वर्गणीदार मोहिमेसंदर्भात माहिती दिली.