Published On : Tue, Aug 6th, 2019

पीओपी गणेश मूर्तींबाबत कठोर कारवाई करा!

महापौर नंदा जिचकार यांचे निर्देश : आरोग्य समिती सभापतींसह घेतला झोननिहाय व्यवस्थेचा आढावा

नागपूर : महिनाभरानंतर येणा-या गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी सारेच सज्ज झाले आहेत. दरवर्षी प्रमाणेच यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे. मात्र या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला पीओपी मूर्तींमुळे बाधा निर्माण केली जाते. आपल्या शहराचे वैभव असलेले तलाव या मूर्त्यांमुळे प्रदुषित होतात, जलचरांनाही धोका निर्माण होतो. पीओपी मूर्तींबाबत उच्च न्यायालयाने गांभीर्य दर्शवित पीओपी मूर्त्यांच्या मागे लाल खूण करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशाचे पालन व्हावे याची विशेष काळजी घेत आवश्यक तिथे कठोर कारवाई करा, असे सक्त निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी संदर्भात महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांसह मंगळवारी (ता.६) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत महापौर नंदा जिचकार, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, सत्ता पक्ष प्रतोद दिव्या धुरडे, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, समितीच्या सदस्या विशाखा बांते, लीला हाथीबेड, रूपा रॉय, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, राजू भिवगडे, हरीश राउत, प्रकाश वराडे, अशोक पाटील, सुभाष जयदेव, ग्रीन व्‍हिजील फाउंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, किंग कोबरा ऑर्गेनायजेशन यूथ फोर्सचे संस्थापक अरविंदकुमार रतुडी, वनराई फाउंडेशनचे बाबा देशपांडे, रोटरी क्लब ऑफ नागपूरच्या डॉ. दीपा जमवाल, जोगी भासम, रोटरी क्लब ऑफ नागपूर मिहान टाउनचे पराग घुबडे, हिमांशु झाकर, जनजागृती आव्हान समितीचे प्रदीप हजारे, अनुज समुंद्रे, निसर्ग विज्ञानचे डॉ. विजय घुगे यांच्यासह सर्व झोनचे झोनल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून शहराचे वैभव असलेले तलावांचे संवर्धन करणे हे मनपाचे कर्तव्य आहे. मात्र यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असून शहरातील विविध स्वयंसेवी संस्था यासाठी कार्य करीत आहेत ही अभिनंदनीय बाब आहे. मागील वर्षी सोनेगाव, गांधीसागर, सक्करदरा, अंबाझरी या महत्वाच्या तलावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जनाला प्रतिबंध करण्यात आले होते. यामध्ये यावर्षी नाईक तलावाची भर घालण्यात आली आहे. यावर्षी इतर तलावांसह नाईक तलावामध्येही कोणत्याही प्रकारच्या गणेश मूर्तींचे विसर्जन होउ नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पीओपीच्या गणेश मूर्ती नैसर्गीक तलावांमध्ये विसर्जित होउ नये यासाठी शहरातील विविध भागांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली जाते. यावर्षीही ती व्यवस्था करण्यात येणार असून शहरातील प्रमुख ठिकाणांसह दहाही झोनमध्ये झोनस्तरावर वस्त्यांमध्येही विसर्जनासाठी कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात यावी. नागरिकांच्या सुविधांसाठी तसेच पर्यावरणपूरक गणोत्सवासाठी आवश्यक त्या ठिकाणी विसर्जन टँक वाढविण्यात यावे. गणेश विसर्जनासाठी रबरी कृत्रिम टँकचा वापर करण्यात येतो. मात्र या टँक खराब होत असल्याने दरवर्षी त्या नवीन खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे यावर्षीपासून रबरी कृत्रिम टँकचा वापर पूर्णत: बंद करून त्याऐवजी सेंट्रींगच्या टँक तयार करून त्यामध्येच नागरिकांना मूर्ती विसर्जन करण्यास आवाहन करावे. यासोबतच गणेश विसर्जनामध्ये कोणतिही अडचण निर्माण होउ नये याच्या काळजीसह विसर्जन स्थळी विद्युत व्यवस्था व स्वच्छतेबाबत विशेष लक्ष देण्याचे आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी निर्देश दिले. विसर्जनासाठी कृत्रिम टँकसाठी मागील वर्षी जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीडीसी)तर्फे निधी देण्यात आला होता. यावर्षीही वाढीव कृत्रिम टँकसाठी डीपीडीसीकडे मनपातर्फे मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विसर्जनासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास प्रतिबंध

बैठकीत विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या सूचना व संकल्पना मांडल्या. ग्रीन व्‍हिजील फाउंडेशनतर्फे गणेश मूर्ती विसर्जनासाठी पिण्याचे पाणी न वापरण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शहरात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी मनपा प्रयत्नरत आहे. अशात गणेश विसर्जनासाठी कोणत्याही कृत्रिम टँकमध्ये पिण्याचे पाणी वापरण्यात येउ नये असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. शहरातील विविध भागातील सार्वजनिक विहीरींची स्वच्छता करण्यात आली असून या ठिकाणी पम्पही लावण्यात आले आहेत. स्वच्छ करण्यात आलेल्या या सार्वजनिक विहीरींचे पाणी विसर्जनासाठी वापरण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.

तसेच गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलीत करण्यात येतो. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून सुगंधीत अगरबत्ती वा आदी उपयोगी उत्पादने निर्माण करणा-यांना निर्माल्य विनामूल्य देण्यात असल्याचेही महापौरांनी सांगितले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असून यासाठी शहरातील विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी, वाहतूक पोलिस आदींसोबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.