Published On : Tue, Aug 6th, 2019

दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी निधी खर्च करावा : महापौर

Advertisement

दुर्बल घटक समिती सभापती गोपीचंद कुमरे यांचे पदग्रहण

नागपूर : नागपूर शहरातील दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी उपलब्ध असलेला निधी खर्च करावा, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. नागपूर महानगरपालिकेच्या दुर्बल घटक समितीचे नवनिर्वाचित सभापती गोपीचंद कुमरे यांनी मंगळवारी (ता. ६) मावळते सभापती हरिश दिकोंडवार यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आमदार डॉ. मिलिंद माने, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती अभय गोटेकर, अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती संजयकुमार बालपांडे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सत्तापक्ष प्रतोद दिव्या धुरडे, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, लकडगंज झोन सभापती राजकुमार सेलोकर, दुर्बल घटक समितीचे मावळते सभापती हरिश दिकोंडवार, नगरसेवक राजेश घोडपागे, राजेंद्र सोनकुसरे, नगरसेविका शिल्पा धोटे, विद्या मडावी, रुतिका मसराम, प्रमिला मंथरानी, सुषमा चौधरी, भाजपचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश गुप्ता यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, दुर्बल घटक समितीला नागपूर महानगरपालिकेत विशेष महत्त्व आहे. स्वतंत्र निधी आहे. या निधीच्या माध्यमातून दुर्बल घटकांसाठी कार्य व्हावे. सभापतींनी वर्षभराच्या कार्यकाळात ठिकठिकाणी भेटी देऊन दुर्बल घटकांच्या समस्या जाणून घ्याव्या आणि त्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

आमदार डॉ. मिलिंद माने म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात दुर्बल घटक समिती असलेली एकमेव महानगरपालिका म्हणजे नागपूर महानगरपालिका आहे. स्थायी समितीनंतर सर्वाधिक महत्त्व असलेली ही समिती आहे. या समितीच्या माध्यमातून सभापती गोपीचंद कुमरे यांच्या कार्यकाळात दलित वस्तींमधील छोटी-छोटी कामे पूर्णत्वाकडे नेण्याचे काम व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मावळते सभापती हरिश दिकोंडवार यांनीही वर्षभरातील कार्याचा अनुभव सांगत शक्य तितके चांगले कार्य करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. नवनिर्वाचित सभापतींनी उर्वरीत कामे तडीस न्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सभापती गोपीचंद कुमरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. सभापतीकाळात समितीच्या कार्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यानंतर सभापती गोपीचंद कुमरे यांनी मावळते सभापती हरिश दिकोंडवार यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर सर्व उपस्थितांनी सभापतींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन प्रतोद दिव्या धुरडे यांनी केले. कार्यक्रमाला पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.