नागपूर: कर थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. शहरातील विकासकामांसाठी मनपाची आर्थिक स्थिती बळकट करणे, हे आपले लक्ष्य असले पाहिजे. त्यासाठी कर वसुली अत्यावश्यक आहे. कर वसुलीसाठी कडक पावले उचलावी, अन्यथा कर वसुलीत दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नवनियुक्त स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा यांनी दिला. ३१ मार्चपर्यंत ९० टक्क्यांच्या वर करवसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देशही त्यांनी सर्व झोनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले.
शुक्रवारी (ता.१६) विक्की कुकरेजा यांनी स्थायी समिती सभापतीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच लक्ष्मीनगर, धरमपेठ, धंतोली झोन कार्यालयात बैठक घेऊन कर वसुलीचा आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, कर अधीक्षक गौतम पाटील, प्रफुल्ल फरकासे प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम लक्ष्मीनगर झोनमधील सद्यस्थितीतील कर वसुली, थकबाकी व प्रस्तावित डिमांड किती आहे, याचा त्यांनी आढावा घेतला. झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने यांनी झोनच्या कर वसुली व थकबाकीची माहिती दिली. झोनअंतर्गत ३७ हजार डिमांड प्रस्तावित असून चार हजार डिमांडचे वाटप झाले आहे. बाकी डिमांडचे वाटप २३ मार्चपर्यंत होईल, अशी माहिती त्यांनी दिली. ज्यांची थकबाकी २५ हजारांपेक्षा जास्त आहे, अशा १७५ मालमत्ताधारकांना हुकूमनामा देण्यात आला आहे. ज्यांची थकबाकी २५ हजारांपेक्षा कमी आहे, अशा १०६८ मालमत्ताधारकांना पेशी नोटीस बजाविण्यात आली आहे. कर संग्राहकांची कामगिरी बघून स्थायी समिती सभापतींनी संताप व्यक्त केला. ३१ मार्चपर्यंत ९० टक्क्यांच्या वर कर वसुली करण्यात यावी, असे निर्देश देत दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा यांनी दिला. यावेळी लक्ष्मीनगर झोनचे सभापती प्रकाश भोयर, नगरसेविका सोनाली कडू, झोन सहायक आयुक्त सुवर्णा दखने उपस्थित होत्या.

यानंतर मान्यवरांनी धंतोली झोनचा आढावा घेतला. धंतोली झोनच्या बैठकीला धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले, नगरसेविका लता काडगाये, झोन सहायक आयुक्त स्मिता काळे प्रामुख्याने उपस्थित होत्या. धंतोली झोनमध्ये कर थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. कर निरिक्षक व कर संग्राहकांने घरोघरी संपर्क करून मालमत्ताधारकांना डिमांड पोहचविण्यात याव्या, असे निर्देश सभापती विक्की कुकरेजा यांनी दिले.











