Published On : Fri, Mar 16th, 2018

तेजस्विनी योजनेअंतर्गत खास महिलांसाठी येणार ‘इलेक्ट्रिक बस’

Advertisement


नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेअंतर्गत चालणाऱ्या ‘आपली बस’च्या ताफ्यामध्ये खास महिलांसाठी लवकरच ‘इलेक्ट्रिक बस’ दाखल होणार आहे. याअंतर्गत सहा इलेक्ट्रिक बसची खरेदी होणार असून महिलांच्याच हस्ते या बसचे लोकार्पण होणार आहे.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात शुक्रवारी (ता. १६) पार पडलेल्या परिवहन समितीच्या बैठकीत यासंदर्भातील विषयाला मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात बैठकीत अधिक माहिती देताना समितीचे सभापती बंटी कुकडे म्हणाले, ही ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल होणाऱ्या या सर्व इलेक्ट्रिक बसेस महिलांना समर्पित राहील. या बसेच महिला सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण असतील. महिलांसाठी आवश्यक सर्व सोयी या बसमध्ये असतील. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे राहणार असून ते पूर्ण वेळ कार्यान्वित असतील. महिला विशेष बसमधील वाहकही महिलाच राहणार असून बसच्या चालकही महिलाच राहतील, यादृष्टीने आपले प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बसमुळे मनपाच परिवहन विभागाचा आर्थिक तोटा कमी करण्यास मदत होणार आहे. कारण या बस पूर्णपणे इलेक्ट्रिक चार्जींगवर चालणार आहेत. त्यामुळे डिझेलच्या खर्चाची बचत होणार आहे. या बस लवकरात लवकर ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल व्हाव्यात, यासाठी आपले प्रयत्न राहतील. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटविणाऱ्या महिला, गरीब होतकरू विद्यार्थिनी यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहितीही सभापती बंटी कुकडे यांनी यावेळी दिली.

बैठकीला समितीचे उपसभापती प्रवीण भिसीकर, सदस्य अभिरूची राजगिरे, अर्चना पाठक, उज्ज्वला शर्मा, मनिषा धावडे, विद्या मडावी, नरेंद्र वालदे, नितीन साठवणे, वैशाली रोहणकर, कल्पना कुंभलकर, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, लेखाधिकारी विनय भारद्वाज, वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, अतांत्रिक पर्यवेक्षक रामराव मातकर उपस्थित होते.