नागपूर: नागपूर शहरात विकासकामे करीत असताना ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाची शिदोरी कामी येत आहे. शहराचा शाश्वत विकास करताना ज्येष्ठ नागरिक या महत्त्वाच्या घटकाकडे आमचे विशेष लक्ष आहे. दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आम्ही तयार करीत आहोत. ज्येष्ठ नागरिकच याचे संचलन करणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात प्रत्येक उद्यानात ज्येष्ठ विरंगुळा केंद्राची निर्मिती करण्यात येईल, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
सुयोगनगर उद्यानातील ज्येष्ठ विरंगुळा केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंचावर मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, प्रभागाचे नगरसेवक अविनाश ठाकरे, संदीप गवई, नगरसेविका जयश्री वाडीभस्मे, विशाखा मोहोड, संजय तिवारी, भाजपचे मंडळ अध्यक्ष रमेश भंडारी, महामंत्री आशीष पाठक, सचिन कारळकर, प्रभाग अध्यक्ष भूषण केसरकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, सहाही विधानसभा क्षेत्रात दक्षिण-पश्चिम मतदारसंघात विकासकामे जोमात सुरू आहेत. विकासाच्या बाबतीत नागपूर देशात आघाडीवर आहे. विकास करताना तो शाश्वत व्हावा, याकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. महापौर निधीतूनही शाश्वत काम व्हावे म्हणून ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची संकल्पना पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.
सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले, दक्षिण-पश्चिमचे आमदार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. एकट्या या मतदारसंघात मागील साडे तीन वर्षात २७५ कोटींची विकासकामे झालीत. पुढील दीड वर्षात उर्वरीत सर्व विकासकामे पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी दिला. यावेळी श्रीनगर येथील जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे उपाध्यक्ष हरिश गुंडावर आणि श्री. भालेराव यांनी मंडळाच्या वतीने आपले मत व्यक्त करीत काही मागण्या मांडल्या. त्यानंतर महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. संचालन नगरसेविका विशाखा मोहोड यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अनिल पालेवार, सचिव श्याम माणूसमारे, उपाध्यक्ष हरिश गुंडावार, शैलजा बेलोरकर, कोषाध्यक्ष अजय पागोटे, सदस्य कुंजलता पालेवार, रजनी पुनियानी, बी.बी. सूरसावंत, हरिभाऊ इंगोले, विजय नंदनवार, ज्योती शौचे, दत्तोपंत पत्तीवार यांची उपस्थिती होती.