Published On : Tue, Aug 8th, 2017

शहर निरोगी राहील याची विशेष काळजी घ्या – मनोज चापले

नागपूर: नागपूर शहरात रोगराई पसरणार नाही, शहर निरोगी राहील याची विशेष काळजी घेण्यात यावी असे निर्देश सभापती मनोज चापले यांनी दिले. वैद्यकीय सेवा व आरोग्य समितिच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी समिती सदस्य लखन येरावार, विजय चुटेले, सदस्या भावना लोणारे, आशा नेहरू उईके, वंदना राजु चांदेकर, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता)डॉ.प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (एस.एम.) डॉ.अनिल चिव्हाने, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, डॉ.विजय जोशी, उपस्थित होते.

झोनल अधिकारींना वाहन मिळण्याबाबत सादर केलेला अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचेआदेश सभापतींनी यावेळी बैठकीत दिले. गणपती विसर्जन हे कुत्रिम तलावातच करावे,झोन निहाय आवश्यक कुत्रिम तलावांची माहिती सभापती मनोज चापले यांनी झोनल अधिका-यांना मार्फत घेतली.मोठ्या गणपतीच्या मुर्त्या ह्या फुटाळा तलावात विसर्जित होत असल्याने त्यात पाण्याची उपलब्धता किती आहे याचा आढावा घेण्यात यावा असे आदेश त्यांनी यावेळी अधिका-यांना दिले. शुक्रवार तलाव,सक्करदरा तलाव, नाईक तलाव यांच्या सभोवताल संरक्षक कडे बांधण्यात येणार असल्याची माहिती झोनल अधिकारींनी सभापतींना दिली.

संसर्गजन्य, डेंग्यु, व किटकजन्य रोगावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करताना डेंग्युची तपासणी घरोघरी जाऊन करणे शक्य नाही, त्यासाठी महाल व सदर याठिकाणी त्याची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती डॉ.अनिल चिव्हाने यांनी दिली. डेंग्युच्या रूग्णांची तपासणी करावी व त्यांना योग्य उपचार देण्याचे निर्देश सभापती चापले यांनी दिले. गणेशोत्सवात जनजागृती फलक लावण्यात यावे व ते फलक झोननिहाय वितरित करण्यात यावे असे निर्देश चापले यांनी दिले.

हिवताप व हत्तीरोग विभागाचा कामकाजाचा आढावा घेतला. त्याबाबत विभागाच्या अधिकारी जयश्री थोटे यांनी विभागाद्वारे घेण्यात आलेल्या रात्रकालीन सर्वेक्षण शिबिर, जनजागृती मोहिम, नियमित रूग्णांची होणारी तपासणी याबाबत माहिती सादर केली. हा रोग कायमचा नष्ट करण्यात यावा यासाठी विभागाद्वारे विशेष प्रयत्न करावे असे निर्देशित केले.

नागपूर महानगरपालिकेचे हॉस्पीटलची देखरेख व देखभाल ही झोनमार्फत व्हावी, त्याची डागडुजी करण्यात यावी अशी सूचनाही सभापती चापले यांनी केली. सार्वजनिक व सामूदायिक शौचालयासंदर्भातील आढावा यावेळी सभापतींनी घेतला. कनक रिसोर्सेसच्या संदर्भात झोनअंतर्गत फिरणा-या कचरागाडींचा आढावाही सभापती चापले यांनी घेतला.