Published On : Sat, Oct 5th, 2019

स्वच्छता आणि सुरक्षेबाबत विशेष काळजी घ्या : आयुक्त अभिजीत बांगर

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी येतात. देशाच्या विविध भागातून येणा-या आंबेडकरी अनुयायांना मनपातर्फे योग्य सुविधा पुरविणे आवश्यक आहे. दीक्षाभूमी व संपूर्ण परिसरात स्वच्छता कायम राहावी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करुन नागरिकांना कोणतिही असुविधा होउ नये याबाबत विशेष काळजी घ्या, असे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

येत्या मंगळवारी ८ ऑक्टोबरला होणा-या ६३व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या समारंभाबाबत दीक्षाभूमीवर मनपातर्फे पुरविण्यात येणा-या आवश्यक सुविधांचा शनिवारी (ता.५) आयुक्त अभिजीत बांगर व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आढावा घेतला. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर, कार्यकारी अभियंता ए.एस.मानकर, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य डॉ.सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, एन.आर.सुटे यांच्यासह मनपाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी आयुक्त अभिजीत बांगर यांनी दीक्षाभूमी येथे भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांनी संपूर्ण दीक्षाभूमी परिसरातील तयारीची पाहणी केली. आवश्यक दुरुस्त्यांबाबत संबंधित अधिका-यांना निर्देशही दिले. नागरिकांच्या सुविधांसाठी मनपातर्फे महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र तात्पुरते प्रसाधनगृह निर्माण करण्यात येत असून याचीही पाहणी आयुक्तांनी केली.

लाखो अनुयायांच्या सुविधेसाठी कार्यरत स्वच्छता कर्मचा-यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. स्वच्छता कर्मचा-यांनी जॅकेट, हॅण्ड ग्लोज, मास्क आदी सुरक्षा साहित्य वापरूनच कार्य करावे. त्यांच्या कार्यावर योग्य देखरेख ठेवणे व वेळोवेळी योग्य सूचना देण्यासाठी प्रभारींची नियुक्ती करण्यात यावी. तात्पुरत्या प्रसाधनगृहांमध्ये नेहमी स्वच्छता राहावी याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ तैनात करणे तसेच दुर्गंधी पसरू नये यासाठी आवश्यक फवारणी करणेही आवश्यक आहे. प्रसाधनगृह ठिकाणी स्वच्छतेबाबत कोणतिही तक्रार येउ नये यासाठी प्रत्येक ५ ते १० प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसाठी एक स्वच्छता कर्मचारी नियुक्त करुन चोविस तास अविरत स्वच्छता राहावी यासाठी वेळेनुसार त्यांच्या ड्युटी लावण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.

नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी मनपा व शासनाच्या रुग्णवाहिका सेवेत तैनात ठेवण्यात याव्यात. वैद्यकीय सुविधांच्या स्टॉल्सवर आवश्यक औषधांचा पुरवठा व्हावा याची काळजी घेण्याचेही त्यांनी निर्देशित केले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन विभागाने आपली यंत्रणा तैनात ठेवण्याचेही निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा पुरविल्या जाव्यात यासाठी दीक्षाभूमी परिसरामध्ये मनपाचे उपद्रव शोध पथकही तैनात करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

अनुयायांच्या सेवेत मनपा नियंत्रण कक्ष
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य समारंभासाठी देशभरातून येणा-या अनुयायांच्या सुरक्षेसाठी मनपा व पोलिस प्रशासनाचे नियंत्रण कक्ष कार्यान्वित असते. नियंत्रण कक्षावर स्वयंसेवकांमार्फत नागरिकांना आवश्यक माहिती पुरविली जाईल व आवश्यक मदतही केली जाणार आहे. या नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक सर्वांना सहजतेने उपलब्ध व्हावेत यासाठी समारंभ ठिकाणी परिसरात एलईडी स्क्रीन तसेच ठिकठिकाणी फलक लावून त्यावर हे क्रमांक दर्शविण्यात यावेत. याशिवाय ‘सिंगल यूज प्लास्टिक मुक्त अभियाना’बाबतही जनजागृती करणारे फलक ठिकठिकाणी दर्शविण्यात यावेत तसेच एलईडी स्क्रीन वरुन वेळोवेळी त्याबाबत जनजागृती करण्यात यावी. स्वच्छतेसह नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आवश्यक काळजी घ्यावी. पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह यांच्या ठिकाणाचे माहिती दर्शविणारे फलक मार्गावर लावण्यात यावेत. पाण्याच्या ठिकाणी ओलावा निर्माण होउन अस्वच्छता पसरू नये यासाठीही आवश्यक उपाययोजना करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.