नागपूर : मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा व पैनगंगा नद्या तुफान भरल्या असून, शेतं जलमग्न झाली आहेत. त्यामुळे ज्वारी, कापूस, सोयाबीनसह चाऱ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सरकारने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केली.
मराठवाडा व विदर्भातील अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांमध्ये शेकडो एकर पिके पावसामुळे उध्वस्त झाली आहेत. “शेतकरी हवालदिल झाले आहेत, मागील वेळच्या अतिवृष्टीचे नुकसानभरपाईचे पैसे अजूनही दिलेले नाहीत. एकीकडे सरकार कर्ज काढतेय, मग शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीही कर्ज काढावे, पण त्यांना त्वरित मदत मिळाली पाहिजे,” असे वडेट्टीवार म्हणाले.
‘शिवभोजन थाळी बंद करण्याचा सरकारचा डाव’
वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर शिवभोजन योजनेबाबत गंभीर आरोप केले. “सात महिन्यांपासून या योजनेसाठी निधी दिलेला नाही. सरकारला गरीबांसाठीची योजना बंद करायची आहे का? मेहनत करून जेवण बनवणाऱ्यांना पैसे दिले जात नाहीत. सरकार त्यांचा आत्महत्या करण्याची वाट पाहत आहे का?” असा सवाल त्यांनी केला.
राज्याचा कोषागार रिकामा झाल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले, आधार नसलेल्या योजना सुरू आहेत, ठेकेदारांना पैसे मिळत आहेत; मात्र आमदारांना निधी मिळत नाही. मग खरंच राज्याच्या अर्थकारणाची अवस्था गंभीर आहे,असेही त्यांनी नमूद केले.