Published On : Thu, Jul 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करा

स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी दिले निर्देश
Advertisement

नागपूर: शहरातील सखल भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा करण्यासाठी तसेच नदी व नाल्यांच्या संरक्षण भिंतीचे मजबुतीकरण करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना कराव्या, असे निर्देश स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी दिले.

पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरातील सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करणे, नागनदी, पिवळी नदी व पोहरा नदीच्या संरक्षण भिंतीचे बळकटीकरण करणे तसेच मनपाच्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याच्या संदर्भात स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांची डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात बैठक घेतली. यावेळी सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, नगरसेवक श्री. मनोज साबळे, मुख्य अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता अनिल गेडाम, उपायुक्त श्री. गणेश राठोड, उपायुक्त श्री. अशोक गराटे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह सर्व झोनचे सहाय्यक आयुक्त व कार्यकारी अभियंता प्रमुख्याने उपस्थित होते.

पावसाळ्यात सखल भागांमध्ये साचणाऱ्या पाण्याची त्वरित विल्हेवाट लावण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक झोनमधील अधिक पाणी साचणारे स्पॉट शोधून या सखल भागातून पाण्याचा निचरा कसा त्वरित करता येईल, यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे श्रीमती दाणी-वखरे यांनी सांगितले.

शहरातील नागनदी, पिवळी नदी व पोहरा नदीच्या संरक्षण भिंतीच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्वरित उपाययोजना करण्यात याव्या. यासंदर्भात संबंधित झोन सभापती व नगरसेवकांच्या सूचनांचा प्राधान्याने विचार करावा. प्रत्येक कार्यकारी अभियंत्यांनी कामाचे प्राधान्य क्रम ठरवून त्वरित कामे करण्याच्या सूचना श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी दिल्या.

Advertisement

खुल्या चेंबरला त्वरित झाकणे लावा- नरेंद्र (बाल्या) बोरकर

शहरातील गडर लाईनच्या खुल्या चेंबरला झाकणे त्वरित लावण्याची सूचना सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी केली. गडरलाईनचे चेंबर खुले राहत असल्याने अनेकदा दुर्घटना घडण्याची शक्यता राहते. यासाठी चेंबरवर झाकणे लावण्याचे काम त्वरित करण्यात यावे. त्याचप्रमाणे गडरलाईनचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराला दर्जेदार गडर लाईन बांधण्याचा पुरेसा अनुभव असण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अनेकदा कंत्राटदाराला गडरलाईन बांधण्याचा पुरेसा अनुभव नसल्याने काम चांगले होत नाही. यामुळे नागरिकांना तसेच लोकप्रतिनिधींना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

75 इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग होणार

नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील मनपाच्या 75 इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक झोनमधील मनपाच्या शाळा, ग्रंथालये, दवाखाने, झोन कार्यालये, उद्याने, खेळाची मैदाने, स्टेडियममध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करून पावसाचे पाणी विहीर किंवा बोअरवेलमध्ये झिरपेल, याची काळजी घेतली जाईल. यामुळे शहरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, असे आयुक्त डॉ. विपीन यांनी यावेळी सांगितले. ज्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रणाली बंद अवस्थेत आहे. ही प्रणाली त्वरित सुरू करावी व ज्या इमारतींमध्ये ही व्यवस्था नाही, त्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची प्रणाली सुरू करण्याची सूचनाही यावेळी आयुक्त डॉ. विपीन यांनी यावेळी दिल्या.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.