Published On : Thu, Jan 23rd, 2020

अतिक्रमणसंदर्भात तातडीने कारवाई करा!

Advertisement

– महापौर संदीप जोशी : धरमपेठ झोनमधील ‘जनता दरबार’मध्ये ९१ तक्रारींवर सुनावणी

नागपूर : धरमपेठ झोनमध्ये व्यासयिक प्रतिष्ठाने, ट्यूशन क्लासेस, हॉटेल्स, हॉस्पीटल आदींमुळे अतिक्रमणाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांच्याही सर्वाधिक तक्रारी अतिक्रमणबाबतच असल्याने याबाबत प्राधान्याने कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत तातडीने कारवाई करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

बुधवारी (ता.२२) धरमपेठ झोनमधील ‘जनता दरबार’मध्ये महापौर संदीप जोशी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक सर्वश्री संजय बंगाले, निशांत गांधी, विक्रम ग्वालबंशी, प्रमोद कौरती, नगरसेविका रूपा राय, प्रगती पाटील, वर्षा ठाकरे, परिणीता फुके, शिल्पा धोटे, उज्ज्वला शर्मा, झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

धरमपेठमधील ‘जनता दरबार’मध्ये ९१ नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. अतिक्रमण, प्रदुषण, पार्किंग, मलवाहिनी, कचरा, केबलसाठी खोदलेले खड्डे, विद्युत दिवे, उद्यानांमधील असुविधा अशा विविध विषयांवर यावेळी तक्रारी मांडण्यात आल्या.

अतिक्रमणच्या संदर्भात यावेळी सर्वाधिक तक्रारी मांडण्यात आल्या. धरमपेठ झोनमध्ये गोकुलपेठ मार्केट येथे अतिक्रमण करून भाजी विक्री, गोकुलपेठ येथील कांजी हाउस, स्मृतीगंध व जय बजरंग सोसायटी तेलंगखेडी येथील अनधिकृत बांधकाम, झेंडा चौक, आदिवासी सोसायटी वृंदावन कॉलनी, हजारी पहाड, तेलंगखेडी, खरे टाउन नारायण अपार्टमेंट येथील अतिक्रमण अशा विविध ठिकाणच्या अतिक्रमणच्या समस्यांशी यावेळी अवगत करण्यात आले. संपूर्ण शहरामध्ये अतिक्रमण संदर्भात कारवाई सुरू आहे. अतिक्रमणाच्या समस्येबाबत संबंधित अधिका-यांनी प्राधान्याने कार्य करून व आवश्यक ठिकाणी मोका पाहणी करून अतिक्रमण हटविण्याबाबत सक्त कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. रामदासपेठ येथील क्रिम्स हॉस्पीटलपुढे वाहन उभी करण्यात येत असल्याने परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.

यासंबंधी परिसरात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशीत करण्यात आले. आंबेडकरनगर येथील वारंवार गडरलाईन चोक होत असल्याच्या तक्रारीसंदर्भात संबंधित अधिका-यांनी स्वच्छता निरीक्षकासह मोका पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. गांधीनगर येथील मैदानाला सुरक्षा भिंत नसल्याने सदर ठिकाणी रात्रीच्या वेळी असामाजिक तत्वांचा वावर असतो. त्यामुळे मैदानाला सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी यावेळी परिसरातील नागरिकांमार्फत करण्यात आली.

यासंबंधी येणारे अडथळे दुर करून आवश्यक कार्यवाही तातडीने करणे. याशिवाय जागृती कॉलनी भारतीय बौध्द महासभा येथे सार्वजनिक वाचनालय निर्माण करण्याची मागणी करण्यात आली. यासंबंधात जागेची उपलब्धा तपासून पुढील कार्यवाही करण्याचेही निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

तुटलेली सिवर लाईन, नवीन सिवर लाईन टाकणे, पावसाचे पाणी घरात शिरू नये म्हणून पावसाळी नालीची निर्मिती यासह विविध मागण्याही महापौरांच्या ‘जनता दरबार’मध्ये करण्यात आल्या. संबंधित कामांमध्ये येणारे अडथळे दुर करून येत्या ७ दिवसांमध्ये प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.