Published On : Thu, Jan 23rd, 2020

उराशी ध्येय बाळगा, मेहनत करा, यश तुमचे आहे

यशस्वी महिला उद्योजिकांनी दिला मंत्र : शास्त्रीय संगीताने रसिक मंत्रमुग्ध

नागपूर : आकाश मोकळे आहे. फक्त झेप घेण्यासाठी महिलांनी संकल्प करायला हवा. ध्येय निश्चित करा. त्या दिशेने वाटचाल करा. मेहनत करा. यश तुमच्या पायाशी लोळण घेईन, असा मंत्र महिला उद्योजिका मेळाव्याच्या मंचावरून यशस्वी महिला उद्योजकांनी दिला.

नागपूर महानगर पालिका, महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण विभागाच्या वतीने १९ ते २६ जानेवारी दरम्यान रेशीमबाग मैदानावर आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या चवथ्या दिवशीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी धनश्री गंधारे, स्वाती शिंगी या यशस्वी महिला उद्योजिका उपस्थित होत्या. यावेळी मंचावर भाजप महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष कीर्तिदा अजमेरा, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती संगीता गिर्हे, धंतोली झोन सभापती लता काडगाये, मनपातील प्रतोद दिव्या धुरडे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, नगरसेविका मंगला खेकरे, सुषमा चौधरी, उपअभियंता तथा मनपातील महिला तक्रार निवारण समितीच्या सचिव कल्पना मेश्राम यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना ट्रॅव्हल्स व्यवसायी धनश्री गंधारे यांनी त्यांच्या व्यवसायातील चढउतारांची माहिती दिली. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुठल्याही व्यवसायात महिलांनी आत्मविश्वासाने उडी घेतली आणि प्रामाणिकपणे कार्य केले तर ती यशाचे अत्युच्च शिखर गाठू शकते, असे सांगितले.

फर्निचर व्यवसायी स्वाती शिंगी यांनीही आपल्या यशस्वीतेची कहानी कथन केली. आपल्या कुठल्याही कामात आपले ‘बेस्ट’ द्या. आपल्या कामावर आणि कलेवर विश्वास ठेवा. जी महिला व्यवसायात मन लावून उतरेल आणि काम करेल, ती यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

भाजप महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष कीर्तिदा अजमेरा यांनी महिलांनी उद्योगासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविकातून नगरसेविका मंगला खेकरे यांनी महिला उद्योजिका मेळाव्याचा दहा वर्षांचा यशस्वी प्रवास सांगितला. कार्यक्रमाचे संचालन अदिती एडलावर यांनी केले. आभार मिनाक्षी चिडे यांनी मानले. यानंतर प्रख्यात शास्त्रीय गायिका स्वरांगी मराठे यांच्या गायनाने कार्यक्रमात रंगत आणली.

महिलांसोबत बालव्यंगचित्रकार साचीचा सत्कार
महिला उद्योजिका मेळाव्यात बुधवारी चार महिलांचा आणि बालव्यंगचित्रकार साची अरमरकर हिचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती महिलांमध्ये दुर्गावहिनीच्या महानगर संचालिका सारिका येवले, भारुडकार संजीवनी देशपांडे, रिफ्रेश व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका प्रांजली ताल्हान, नंदाताई कोल्हटकर यांचा समावेश होता.

समाजप्रबोधनपर भारुड
महिला उद्योजिका मेळाव्याच्या चवथ्या दिवशी दुपारच्या सत्रात माहेर महिला मंडळाच्या वतीने संजीवनी देशपांडे आणि चमूने समाजप्रबोधन करणारे भारुड सादर करण्यात आले. मुलगी वाचवा, मतदान करा, स्वच्छता राखा असा संदेश देत शासकीय योजनांबाबत जनजागृती केली. लोकशाही पंधरवाड्याच्या माध्यमातून मतदानाचे महत्व सांगण्यात येत आहे. २५ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येत असलेल्या लोकशाही पंधरवाड्यात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.