Published On : Wed, Dec 5th, 2018

अतिक्रमण, नाले सफाई, सांडपाण्याबाबत तात्काळ कारवाई करा : महापौर नंदा जिचकार

महापौर आपल्या दारी : आसीनगर झोनमधील प्रभाग २ आणि ३चा घेतला आढावा

नागपूर: अतिक्रमण, सांडपाणी, अस्वच्छता या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा. मुलभूत सोयी-सुविधा हा नागरिकांचा अधिकार आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रत्येक तक्रारींची दखल घेऊन त्याचे तात्काळ निरसन करा, असे निर्देश देत स्वच्छतेच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही असा इशारा महापौर नंदा जिचकार यांनी अधिकाऱ्यांना दिला.

Advertisement

नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या झोननिहाय जनसंवाद कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत महापौर नंदा जिचकार नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील झोननिहाय, प्रभागनिहाय समस्या ऐकून घेणार आहेत. या उपक्रमांतर्गत बुधवारी (ता. ५) महापौरांनी आसीनगर झोनमधील प्रभाग २ व ३ चा आढावा घेतला.

यावेळी आरोग्य समिती सभापती मनोज चापले, जलप्रदाय समिती विजय झलके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक मनोज सांगोळे, दिनेश यादव, परसराम मानवटकर, गोपीचंद कुमरे, नगरसेविका नेहा निकोसे, नसीम बानो इब्राहीम खान, सहायक आयुक्त विजय हुमने, आसी नगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, यांच्यासह ओसीडब्ल्यूचे कर्मचारी व संबंधित विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार यांनी आसी नगर झोनमधील रिपब्लिकन नगर, वरपाखड नगर, मिसाल लेआउट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, सहयोग नगर, सुगत नगर, बाबा दीपसिंग नगर, नारी गाव, पिवळी नदी, दीक्षित नगर, संतोष नगर, भन्ते आनंद कौशल्यायन नगर, उप्पलवाडी, भीमवाडी, शिवाजी नगर, गरीब नवाज नगर, वनदेवी नगर आदी ठिकाणी भेट देउन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

झोनमधील सर्व भागामध्ये टँकरनेच पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. सुगत नगर परिसरात बुद्ध विहाराच्या बाजुला असलेली विहीर कोरडी असून त्या विहीरीमध्ये नागरिक कचरा टाकून तो जाळत असल्याचे दौऱ्यामध्ये निदर्शनास आले. या विहिरीची स्वच्छता करून येथे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले.

बाबा दीपसिंग नगरातील काच कंपनी जवळील गुरूद्वारापुढील ५०० मीटर लांबीच्या कच्च्या मार्गामुळे नागरिकांना चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागतो. याशिवाय परिसरात कनक रिसोर्सेच्या कचरा उचलणा-या गाड्या येत नसल्याचीही तक्रार नागरिकांकडून करण्यात आली. परिसरातील रस्त्याच्या कामाबाबत त्वरीत कारवाई करून स्वच्छतेच्या बाबतीत कामचुकारपणा करणाऱ्या कनक रिसोर्सेसवर कारवाई करण्यात यावी, असेही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी निर्देशित केले.

नारी वस्ती लगत वाहणाऱ्या पिवळी नदीमुळे पावसाळ्यात नागरिकांचे मोठे नुकसान होते. नदीच्या तिरावर वस्तीलगत सुरक्षा भिंत नसल्यामुळे पावसाळ्यात वस्तीमध्ये पाणी शिरते. यामध्ये नागरिकांच्या घरातील सामान, जनावरे वाहून जाण्यासह जीवितहानीही झाल्याची तक्रार नागरिकांनी यावेळी केली. नदीच्या काठावर सुरक्षा भिंतीबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करून पावसाळ्यापूर्वी सुरक्षा भिंत तयार करण्याबाबत कारवाई करणे, तसेच परिसरात जनावरांच्या सुरक्षेसाठी पशु दवाखान्याच्या मागणीवर कार्यवाही करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले. नारी वस्ती परिसरातील दहन घाटावर मनपाच्या पुढाकारातून शोक सभागृह निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणी भगवान शिव शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात आली.

न्यू दीक्षित नगर परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमधील सांडपाणी थेट रस्त्यावर येत असून तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या मार्गाचे सिमेंटीकरण करून सांडपाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी प्रतिबंध घालण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. दीक्षित नगरमधील उद्यानांचा विकास करून या ठिकाणी ग्रीन जिमची उपकरणे लावण्याचीही मागणी यावेळी महापौरांना करण्यात आली.

गरीब नवाज नगरमध्ये नाल्याच्या बाजुला महानगरपालिकेचा दवाखाना आहे. या परिसरात घाण असल्याने येथील नागरिकांना त्याचा फायदा होत नाही. हा दवाखाना गरीब नवाज नगरमधील मैदानात असलेल्या सभागृहात स्थानांतरीत करण्याचे महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.

आसी नगर झोनमध्ये पालकमंत्र्यांचा ‘जनसंवाद’ १० ला

नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील झोननिहाय, प्रभागनिहाय समस्या ऐकून घेण्यासाठी, महत्त्वाच्या समस्यांवर, प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ३ डिसेंबर ते ११ फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक सोमवारी झोननिहाय ‘जनसंवाद’ करणार आहेत. या अंतर्गत १० डिसेंबरला आसी नगर झोनमध्ये पालकमंत्र्यांचा ‘जनसंवाद’ होणार आहे. यावेळी नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement