Published On : Fri, Jun 11th, 2021

नागपूर जवळील शहरे कोरोनाची हॉटस्पॉट होणार नाही याची काळजी घ्या -जिल्हाधिकारी ठाकरे

Advertisement

जिल्ल्हाधिकाऱ्यांनी घेतला कामठी नगरपरिषदेचा आढावा, मान्सूनपूर्व कामाचाही आढावा ; शहर स्वच्छतेसाठी मोहिम राबवा, कोरोना संपला नाही; रस्त्यावरील गर्दी कमी करण्याचे आवाहन

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील कोरोना बाधित व मृत्युदर कमी होत आहे ही एकीकडे आनंदाची बाब असली तरी दुसरीकडे रस्त्यावरची गर्दी चिंता वाढविणारी आहे. त्यामुळे नागपूर महानगराच्या आजूबाजूच्या शहरातील नगरपालिकांनी अतिशय सावधतेने प्रतिबंधात्मक कारवाई सुरू ठेवावी. कोणत्याही परिस्थितीत नागपूर जवळील शहरे कोरोनाची हॉटस्पॉट होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज येथे केले.

नागपूरजवळील कामठी नगरपरिषदेला आज त्यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नगर परिषद अध्यक्ष मोहमंद शहाँजहाँ सफाद अन्सारी त्यांच्यासोबत होते. नागपूर महानगरांमध्ये विविध खाजगी आस्थापनावर काम करणाऱ्या कामगारांची व मजूर वर्गाची मोठी लोकसंख्या शहराच्या आजूबाजूला आहे. याशिवाय धाबे, हॉटेल्स, रेस्टॉरंट याठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करणारा वर्ग या परिसरात राहतो. या सर्वांचा मोठ्या प्रमाणात अनेकांशी संपर्क येतो. त्यामुळे प्रत्येकाचे लसीकरण होईल, याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.

गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या लोकप्रिय लोकप्रतिनिधींनी लसीकरणाच्या कार्यात मदत करावी, त्यांचा संपर्क अधिक असून त्यांनी कामगारांच्या, मजुरांच्या वस्तीमध्ये लसीकरणाबाबत आवश्यक संदेश द्यावा. कामठी शहरात रुग्ण संख्येत कमी आली असली तरी रस्त्यावरील गर्दी बघता तिसऱ्या लाटेला आमंत्रण दिले जाणार नाही, यासाठी प्रशासनासोबत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी, पदाधिकारी यांनी देखील मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

शहरालगतच्या मंगल कार्यालयात, लॉनमध्ये तसेच धाब्यांवर गर्दी वाढू नये, शासनाने आदेशात नमूद केल्याप्रमाणेच व्यक्तींची संख्या असावी, सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करण्यात यावे, ग्राहक तसेच इतर सर्व व्यक्तींनी मास्कचा वापर करणे अनिवार्य ठेवावे, परिसर वेळोवेळी सॅनीटाईज करावा व स्वच्छ स्वच्छता ठेवण्यात यावी. कोविड आजाराचे लक्षणे असणारे कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये. प्रत्येकाची चाचणी करावी. आजाराची लक्षणे असणाऱ्या ग्राहकांना देखील प्रवेश देऊ नये, अशा सूचना केल्या. धाबा, हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

मान्सून पूर्व कामठी शहरातील तयारीचा आढावा त्यांनी घेतला. नालेसफाई व स्वच्छता मोहिमेला गंभीरतेने पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी, हिंगणा, वानाडोंगरी, वाडी, सावनेर, खापा, मोहपा, कळमेश्वर, उमरेड, भिवापूर, कुही आदी नगरपरिषद व नगर पंचायतीला त्यांनी भेट दिली आहे. या आठवड्यात अन्य नगरपालिकांना देखील ते भेट देणार आहे.