Published On : Tue, Oct 6th, 2020

कोव्हिड नंतरही घ्या आरोग्याची काळजी

Advertisement

‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ.सुषमा ठाकरे आणि डॉ.उमेश रामतानी यांचा सल्ला

नागपूर : कोव्हिडपासून बचावासाठी सुरक्षा हाच उपाय आहे. सुरक्षेच्या सर्व नियमांचे सर्वांनी कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलीत आहार अत्यंत आवश्यक आहे. कोव्हिड झाल्यास घाबरून न जाता त्याची माहिती डॉक्टरांना देत आवश्यक उपचार मिळवून घेणे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. कोव्हिड झाल्यास अनेकांना लक्षणे नसतात किंवा अनेकांना सौम्य लक्षणे असतात. जोखिमेची लक्षणे असलेल्यांवर रुग्णालयात उपचार केले जाते. विलगीकरणातील निर्धारित कालावधी पूर्ण केल्यानंतर रुग्णाला सुट्टी देण्यात येते. रुग्ण गृह विलगीकरणात असल्यास १७दिवसानंतर त्यालाही बाहेर निघता येउ शकते. मात्र कोव्हिड पॉझिटिव्ह असतानाच्या काळासह कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरच्या काळातही आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर आपण एकदम सुदृढ झालोत आपण कुठेही जाउ शकतो हा गैरसमज कुणीही बाळगू नका. कोव्हिड नंतर अनेकांना अनेक त्रास झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे कोव्हिड होउ नये यासाठी सुरक्षा बाळगा, कोव्हिड झाल्यास योग्य उपचार घ्या आणि कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर आरोग्याची विशेष काळजी घ्या, असा सल्ला आयएमए च्या सहसचिव तथा इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसीन विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सुषमा ठाकरे आणि कन्सल्टंट अ‍ॅनेस्थेसियोलॉजीस्ट अँड पेन फिजिशियन तथा इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बधिरीकरण विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ.उमेश रामतानी यांनी दिला.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतील ‘कोव्हिड संवाद’ फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मंगळवारी (ता.६) डॉ. सुषमा ठाकरे आणि डॉ. उमेश रामतानी यांनी ‘कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर घ्यावयाची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन केले आणि नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसरन केले.

कोव्हिडची लक्षणे दिवसेंदिवस बदलत आहेत. सुरूवातीला ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वास घ्यायला त्रास अशी लक्षणे कोव्हिडबाधितांमध्ये दिसायची. आता चव जाणे, वास न येणे, छातीत दुखणे, हगवण, थकवा अशा लक्षणांसह बधिरता हे लक्षणे सुद्धा काही रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. विनाकारण घराबाहेर पडू नका, पडल्यास मास्क लावा, गर्दीत जाणे टाळा, शारीरिक अंतर राखा. विलगीकरणाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळा. रुग्णालयात किंवा गृह विलगीकरणाचा १७ दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पुन्हा कोव्हिडची चाचणी करण्याची गरज नाही. हा काळ काळजी घेण्याचा आहे. कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर अनेकांना महिनाभराने लक्षणे दिसून येतात तर अनेकांची लक्षणे तीन-तीन महिन्यांपर्यंत कायम असल्याचेही दिसून आले आहे. कोव्हिडनंतर येणा-या कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका त्यासाठी वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा, असे आवाहनही डॉ. सुषमा ठाकरे आणि डॉ.उमेश रामतानी यांनी केले.

कोव्हिड नंतर अनेकांना शारीरिक कमजोरी जाणवते, सांधे दुखी, मांसपेशींमध्ये दुखणे, काहींचे फफ्फुस बाधित झाल्याने श्वास घ्यायला त्रास होणे, रात्री झोप न येणे, झोपेतून उठून बसणे, नैराश्य, वैफल्याची भावना, प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर आजारांचा शिरकाव, नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने हृदयविकाराचा झटका, असे अनेक त्रास कोव्हिडमधून बरे झालेल्यांना जाणवत आहेत. त्यामुळे यासाठी सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या, करता येईल तेवढे सौम्य व्यायाम करा, भरपूर पाणी प्या, पाणी पिणे होत नसल्यास फळांचा रस, नारळपाणी आदींचे सेवन करा. कोव्हिडमध्ये आणि नंतर तेलकट, तिखट, चमचमीत, गोड, जास्त मिठ असलेले पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा. आहारात अंडी खा, ताजी फळे खा. आपल्या जवळपास कुणी कोव्हिडबाधित असल्यास त्यांना सहकार्य करा, मानसिक आधार द्या. कोरोना कुणालाही होउ शकतो, काळजी घेणे, सुरक्षात्मक नियमांचे पालन करणे हाच त्यावरील उपाय आहे. सर्वांनी नियमांचे पालन करून एकत्रित कोरोनाविरुद्ध लढा देउया, कोरोनाला हद्दपार करून एकत्र विजय मिळवूया, असा संदेशही यावेळी डॉ. सुषमा ठाकरे आणि डॉ.उमेश रामतानी यांनी दिला.

Advertisement
Advertisement
Advertisement