Published On : Tue, Oct 6th, 2020

सप्टेंबरमध्ये १ लाख ५२ हजार २२१ नागरिकांची कोव्हिड चाचणी

आतापर्यंत ३ लाख ३७ हजार ४४६ जणांची कोरोना चाचणी

नागपूर: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी मागील सात महिन्यांपासून नागपूर महानगरपालिका आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत असून आता मनपाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी चाचणीवर भर देत शहरात मनपाचे ५० कोव्हिड चाचणी केंद्र व खाजगी चाचणी केंद्रांच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात १ लाख ५२ हजार २२१ चाचण्या करण्यात आल्या. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये ७० हजार ११७ जास्त चाचण्या झालेल्या आहेत.

आय.सी.एम.आर.च्या रेकॉर्डनुसार नागपूर शहरात मार्च महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत सुमारे ७ महिन्यात ३ लाख ३७ हजार ४४६ चाचण्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यापैकी १ लाख ५२ हजार २२९ चाचण्या केवळ सप्टेंबर मध्ये करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६२ हजार ३४२ झाली आहे तर पॉझिटिव्ह रेट १८.५ टक्क्यावर आला आहे.

मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला होता. त्याचा परिणाम म्हणून, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास ८६ टक्यांवर पोहोचले आहे. सप्टेंबर मध्ये ३५ हजार ७४९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते तसेच पॉझिटिव्हिटी दर २३.५ टक्क्यावर होता. दररोज ५००० च्या वर कोरोनाची चाचणी करण्यात आली. आय.सी.एम.आर.च्या रेकॉर्डनुसार ऑगस्टमध्ये ८२ हजार ११२ नागरिकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. या महिन्यात दररोज २६४८ नागरिकांची कोव्हिड चाचणी करण्यात आली असून त्यातून २२ हजार ९४८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. कोरोना चाचणी चा पॉझिटिव्हिटी दर २७.९ टक्क्यावर होता. या महिन्यात चाचणी केंद्रांची संख्याही कमी होती.

जुलै महिन्यामध्ये फक्त ४४ हजार ५०८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती आणि २४०१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. या महिन्याचा पॉझिटिव्हिटी दर फक्त ५.४ टक्के होता. मनपा व खाजगी रुग्णालयांकडून दररोज १४३५ नागरिकांची चाचणी केली जात होती. जून मध्ये ३० हजार २०२ नागरिकांची कोव्हिड-१९ ची चाचणी करण्यात आली त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७५० होती. या महिन्यात दररोज १००० नागरिकांची चाचणी करण्यात आली होती.


मे महिन्यात फक्त २१ हजार ४९१ नागरिकांची कोव्हिड चाचणी करण्यात आली होती यामधून ३५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. या महिन्यात दररोज फक्त ६९३ नागरिकांची तपासणी करण्यात येत होती. एप्रिलमध्ये फक्त ५९८६ नागरिकांची महिन्याभरात चाचणी झाली आणि १२१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मार्चमध्ये नागपूर शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता आणि या महिन्यात ९१८ नागरिकांची चाचणी करण्यात आली होती. फक्त १६ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते.

महापौर श्री. संदीप जोशी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांच्या पुढाकाराने नागपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांची नि:शुल्क कोव्हिड-१९ ची तपासणी करण्यात येत आहे. जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी झाल्यानंतर कोरोनावर नियंत्रण करण्यात मदत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. मनपाव्दारे कोव्हिड चाचणीसाठी १२ ‍विशेष बसेसची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. मनपातर्फे नगारिकांना कोव्हिड-१९ ची चाचणी करण्यासाठी आवाहन केले जात आहे. कोरोना बाधित रुग्णांसाठी ५९ खाजगी व शासकीय रुग्णालयांमधून त्यांच्या उपचाराची सोय करण्यात आली आहे.