Published On : Sat, Jan 18th, 2020

यश मिश्रा प्रकरणात शाळा प्रशासनावर कारवाई करा

Advertisement

शिवसेनेचे गणेशपेठ पोलिसांना निवेदन

नागपूर : स्कूल बसच्या चाकाखाली येऊन चिरडल्या गेलेला शालेय विद्यार्थी यश मिश्रा (८ वर्षे) याच्या मृत्यूप्रकरणी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापन आणि कंडक्टरवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना आणि भारतीय विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. यासंदर्भात पक्षातर्फे अलीकडेच गणेशपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जाधव यांना निवेदन देण्यात आले.

मृतक यशच्या कुटुंबियांना तत्कालीन आर्थिक सहायता निधी उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बजेरियाच्या तेलीपुरा वस्तीत राहणारे यशचे वडील मेवालाल मिश्रा हे रेल्वे स्टेशनवर हातमजुरी करतात. यश हा गड्डीगोदाम येथील ऑरेंज सिटी स्कूलमध्ये शिकत होता.

तो दररोज स्कूलबसने शाळेला जेणे-जाणे करायचा. मात्र, घटनेच्या दिवशी स्कूलबससमोरून रस्ता ओलांडत असताना बसच्या समोरील चाकात सापडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने यशच्या माता-पित्याला मानसिक धक्का बसला आहे. शिवसेनेने या घटनेची दखल घेत संबंधित मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांना पाठविले आहे.

यावेळी शिवसेनेचे दक्षिण-पश्चिम विधानसभा संघटक प्रवीण शर्मा, कमल नामपल्लीवार, करूणा शिंदे, शैलेंद्र आंबिलकर, दिनेश वानखेडे, करण मिश्रा, सुशील उईके, शुभम जोशी, मीना अडकणे, प्रीती लोखंडे, राजू नक्षीणे, विजय थॉमस, आरिफ शेख, अंकित डोंगरे, पराग दामले आदी उपस्थित होते.