Published On : Tue, Jun 1st, 2021

क्रिस्टल हॉस्पिटलवर कारवाई करण्यात विलंब का? : माजी महापौर संदीप जोशी

रुग्णांच्या नातेवाईकांसह पाचपावली पोलिस स्टेशन समोर बुधवारी देणार धरणे

नागपूर: केवळ रुग्णाने तक्रार केली म्हणून सूडभावनेने बायपॅक मशीन हटविण्यात आल्याने १२ मे रोजी दिलीप कडेकर या रुग्णाचा मृत्यू झाला. नागपुरातील क्रिस्टल हॉस्पिटलच्या निष्काळजीपणाबद्दल १३ मे पासून वारंवार पाचपावली पोलिस स्टेशनला पत्र देउन कारवाईची मागणी केली जात आहे. गत १८ दिवसांपासून सखोल चौकशी सुरू आहे, एवढेच उत्तर पोलिस प्रशासनातर्फे देण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाद्वारे क्रिस्टल हॉस्पिटलवर कारवाई करण्यात एवढा विलंब का, असा सवाल करीत रुग्णाच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्या बुधवार २ जून रोजी मृतक दिलीप कडेकर यांच्या नातेवाईकांसह पाचपावली पोलिस स्टेशन पुढे एक दिवस धरणे देणार असल्याचा इशारा माजी महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे.

विशेष म्हणजे, यासंदर्भात संदीप जोशी यांनी पाचपावली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना पत्रही दिले. या पत्रावर कुठलेही उत्तर न देता वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांच्यामार्फत तातडीने नोटीस बजावून ‘असे कुठलेही धरणे देउ नये व दिल्यास कारवाई करू’, असा इशारा देण्यात आला. मृतकाच्या परिवाराच्या न्यायासाठी वारंवार होत असलेल्या चौकशीच्या मागणीवर कुठलेही उत्तर न देणा-या पोलिस प्रशासनाच्या नोटीसनंतरही धरणे देण्याच्या निर्णयावर ठाम असून आपण कारवाई करा, असे उत्तर पोलिस प्रशासनाच्या पोहोच पत्रावरच संदीप जोशी यांनी देत आपली भूमिका मांडली आहे. दिलीप कडेकर या मृतकाच्या नातेवाईकांसह बुधवारी २ जून रोजी पाचपावली पोलिस स्टेशनपुढे धरणे देणारच असा निश्चय माजी महापौर संदीप जोशी यांनी केला आहे.

गत १२ मे रोजी क्रिस्टल हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे दिलीप कडेकर या रुग्णाचा मृत्यू झाला. प्रकृती व्यवस्थित नसताना देखील हॉस्पिटलने केवळ रुग्णाने तक्रार केली म्हणून बायपॅब मशीन काढली. बायपॅब मशीन काढल्यामुळे रुग्णाला प्राणगमवावे लागले. दिलीप कडेकर यांच्या मृत्यूला हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याची भावना त्यांच्या नातेवाईकांची होती. यानंतर १३ मे रोजी रुग्णाच्या नातेवाईकांनी माजी महापौर संदीप जोशी यांच्या सोबत जाउन पाचपावली पोलिस स्टेशनला तक्रार केली होती. १३ मे रोजी केलेल्या तक्रारीनंतर संदीप जोशी यांनी १७ मे रोजी पोलिस आयुक्तांना सुध्दा पत्र दिले. यानंतर २१ मे रोजी पुन्हा पाचपावलीच्या पोलिस निरीक्षकांना पत्र दिले. त्या पत्रामध्ये ‘हॉस्पिटल व्यवस्थापन सांगत आहे की, आमचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही’. हे नमूद करीत रुग्णालय व्यवस्थापनाला एवढा आत्मविश्वास कुठून आला, असा प्रश्न त्यांनी विचारला.

प्रकरणाबाबत कुठहलीही कारवाई होत नसल्याने २२ व २३ मे रोजी संदीप जोशी यांनी पुन्हा पोलिस निरीक्षकांशी स्वत: संवाद साधला असता सखोल चौकशी सुरू असल्याचे उत्तर पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले. तक्रारीच्या १८ दिवसानंतरही चौकशीच सुरू असेल तर त्या चौकशीला गती देउन घटनेस जबाबदार असलेल्यांवर तात्काळ कारवाई करा, या मागणीसाठी ३१ मे ला पुन्हा एक पत्र पाचपावली पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. त्यामध्ये कारवाई न केल्यास बुधवार २ जून रोजी मृतक दिलीप कडेकर यांच्या नातेवाईकांसह स्वत: पाचपावली पोलिस स्टेशनपुढे एक दिवसाचे धरणे देणार, असा इशारा माजी महापौर संदीप जोशी यांनी दिला.

या इशा-यानंतर इतरवेळी कुठलेही उत्तर न देणा-या पोलिस प्रशासनाने संदीप जोशी यांना ताबडतोब एक नोटीस दिले. ‘आपण असे कुठलेही धरणे न देण्याचे आदेश देत आहोत, अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येईल’, अशा पद्धतीच्या धमकावणी आणि कारवाईच्या भाषेमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांनी त्यांना नोटीस दिली. पोलिस निरीक्षकांच्या या धमकी वजा नोटीसला उत्तर म्हणून त्या पोहोच पत्रावरच संदीप जोशी यांनी ‘आपण १८ दिवसात कारवाई करू शकला नाहीत. मात्र नोटीस देण्यामध्ये आपण तत्परता दाखविली त्यामुळे आता निर्णय पक्का झाला असून आता बुधवारी २ मे रोजी १०० टक्के पाचपावली पोलिस स्टेशनपुढे धरणे देणार. आपण माझेवर कारवाई करा’, असे स्पष्ट उत्तर पोलिस निरीक्षकांना दिले.

पोलिस निरीक्षकांच्यावर अपीलीय अधिकारी म्हणून पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांना मंगळवारी (ता.१) संदीप जोशी यांनी निवेदन देउन संपूर्ण प्रकरणावर तात्काळ कारवाई करण्यात यावी यासंदर्भात आग्रह देखील केला. उपायुक्त लोहित मतानी यांनी या प्रकरणात लवकर लक्ष घालून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. एकूणच पोलिस प्रशासनाच्या या निष्काळजी तसेच हलगर्जीपणाच्या धोरणाविरोधात धरणे देण्याचा निर्णय निश्चित असून उद्या बुधवारी (२ जून) नातेवाईकांच्या सोबत धरणे देणार असल्याचेही माजी महापौर संदीप जोशी यांनी सांगितले आहे.