Published On : Sun, Jul 28th, 2019

‘सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ’ नागपूर कॅम्पसचे उद्‌घाटन संपन्न

नागपूर : उच्चशिक्षण देणा-या संस्थेच्या स्थापनेमूळे ‘एज्यूकेशन हब’ म्हणून उदयास येणा-या नागपूरात आज स्थापन होणा-या ‘सिबांयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठामूळे’ नागपूरच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी केले. पूर्व नागपूरातील सुमारे 75 एकरावरील असलेल्या सिबांयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या नागपूर कॅम्पसचे उद्घाटन आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधिर मुनंगटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विद्यापीठाचे कुलपती शं. बा. मुजुमदार, उपकुलगुरू, डॉ. विजया येरवडेकर, महापौर नंदा जिचकार, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे प्रामुख्याने उपास्थित होते.

पूर्वी विदर्भातून राज्याच्या इतर भागात विदयार्थी उच्च शिक्षणासाठी जात होते. पण आता नागपूरध्ये या सर्व संधी उपलब्ध झाल्या आहेत. सिबांयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा आरक्षित असून शैक्षणिक शुल्कातही 15 टक्के सवलतही उपलब्ध आहे. ही सवलत संपूर्ण विदर्भाकरिता लागू करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय रस्ते निधी मघून 20 कोटीची तरतूद करून विद्यापीठाकडे येण्यासाठीच्या रस्त्याचे सिंमेट क्रॉकेटीकरण करण्यात येईल व या परिसरात मेट्रो स्टेशन आल्याने येथे सहज पोहचता येईल. विद्यापीठ परिसरात ’33 कोटी वृक्ष लागवड’ अभियाना अंतर्गत वृक्षारोपण करून रस्त्यालगत सौंदर्यीकरणाची जबाबदारी विद्यापीठाने उचलावी, असेही ग़डकरी यावेळी म्ह्णाले.

मिहानमध्ये पुढील पाच वर्षात 50 हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य असून एच. सी. एल. तर्फे पुढील 3 वर्षात 10 हजार युवकांना रोजगार मिळणार आहेत. अ‍ॅव्हिएशन मैंन्युफैक्चरिंग क्षेत्रात डसॉल्ट, फाल्कन या एयरक्राफ्टच्या स्पेअर पार्टस् निर्मितीचे काम नागपूरातच होणार आहे. सिंबायोसिस लगतच 120 एकरावर भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) संकुल तयार होणार असून यामूळे पूर्व नागपूरचा कायापालट होत असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडळे.

शैक्षणिक संस्थामध्ये दिल्या जाणा-या गुणवत्तापूर्ण शिक्षणामूळेच युवाशक्तीचे रूपांतर मानव संसाधनामध्ये होऊ शकते. असे मत श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी मांडले. या विद्यापीठाला नागपूर महानगरपालिकेने लिझ्‌वर जागा दिली व राज्य मंत्रीमंडळाने त्याला मान्यता दिल्यानंतर सिबांयोसिस संस्थेने 12 महिन्यात हा कॅम्पस निर्माण केला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.

नागपूरमध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थापन होणार असून यामूळे कार्गो व लॉजस्टीक हब क्षेत्राची वाढ होणार आहे. विद्यापीठाने नागपूरची ‘ऑव्हिएशन हब’ ही भविष्यातील ओळख वेळीच हेरुन

‘अ‍ॅव्हिएशन अ‍ॅव्हिऑनिक्स’ संदर्भातील अभ्यासक्रम आखण्याचे काम सुरु केले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

सिंबायोसिसमुळे ‘वसुधैव कुटुंबंकम्‌’ ही भावना रूढ होत आहे , असे मत या संस्थेचे संस्थापक व कुलगुरू डॉ. शं. बा. मुजुमदार यांनी मांडले. पुण्यानंतर सिंबायोसिसचा दुसरा सर्वात मोठा कॅम्पस हा नागपूरात आला असून या विद्यापीठाचा भर हा ‘कौशल्याधारित शिक्षणावर’ राहणार असल्याचे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर यांनी सांगितले.

पूर्व नागपूरातील वाठोडा परिसरात 75 एकर परिसरात असलेल्या ‘सिंबायोसिस’ मध्ये सिंबायोसिस इंस्टिटयूट ऑफ़ बिजनेस मैंनेजमेट, लॉ स्कूल, व स्कूल ऑफ प्लानिंग, ऑर्किटेक्चर, अ‍ॅंड डिझाईनया 3 संस्था सुरू करण्यात आला असून यामध्ये एम. बी. ए, बी. बी. ए, बी. आर्क, एल. एल. बी व एल. एल. एम. हे अभ्यासक्रम जून-2019 या सत्रापासून सुरु करण्यात आले असून सर्व जागांवर प्रवेश झाला आहे. विद्यापीठ परिसरात विद्यार्थी विद्यार्थीनीसांठी वसतीगृह, प्रेक्षागृह, ग्रंथालय, व्यायामशाला इ. सुविधा उपल्ब्ध आहेत, अशी माहिती डॉ. विद्या येरवडेकर यांनी दिली.

या कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठाच्या वास्तूनिर्मितीचे आर्किटेक्चर हाफिज कॉन्ट्रैक्टर यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास सिंबायोसिस समूहाचे पदाधिकारी, शिक्षक, विघार्थी, मोठ्या संख्येने उपास्थित होते.