Published On : Fri, Aug 9th, 2019

स्वच्‍छता हाच निरोगी आयुष्याचा मंत्र : महापौर नंदा जिचकार

मनपा-टाटा ट्रस्टच्या सहकार्याने तेलंगखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

नागपूर: इंदौर शहरातील स्वच्छतेमुळे तेथील नागरिकांचा आरोग्यावर होणारा खर्च ७० टक्क्यांनी कमी झाला. स्वच्छता असेल तर रोगराई पसरत नाही. आरोग्य केंद्राचे निर्माण होणे सोयीच्या दृष्टीने चांगले आहे. मात्र, त्यामध्ये जाण्याची गरजच पडू नये यासाठी परिसर स्वच्छता असायलाच हवी. स्वच्छता हाच निरोगी आयुष्याचा मंत्र आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने हिलटॉप परिसरातील सुदामपुरी येथे तयार करण्यात आलेल्या तेलंगखेडी आदर्श नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मंचावर मनपाचे आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नगरसेविका रुतिका मसराम,उपसंचालक आरोग्य विभाग मनपा डॉ. भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी डॉ. सरीता कामदार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, टाटा ट्रस्टचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी आशीष देशपांडे, टाटा ट्रस्ट कृषी विभागाचे प्रमुख श्री. गणेश, राजगोपाल राव, आदर्श नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकल्पाचे प्रमुख डॉ.अमर नवकर, डॉ. मिनाक्षी सिंग, रवि वाघमारे, तेलंगखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. विनोदकुमार वाघमारे उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महिलांचे नेहमी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. कुटुंब सक्षम करायचे असेल तर महिलांनी स्वत:ला सुदृढ ठेवायला हवे. टाटा ट्रस्टने नागपूर महानगरपालिकेद्वारा संचालित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा चेहरामोहरा बदलविला. आता ही सुंदर आणि सर्व सोयी-सुविधांनी उपलब्ध आरोग्य केंद्र स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, असेही त्या म्हणाल्या. सुदामपुरीतील प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यासाठी नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आणि पाठपुराव्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले, आतापर्यंत नागपूर शहरात १७ दवाखाने सर्व सोयी-सुविधांनी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले आहे. तेलंगखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र १८ वे असून भविष्यात उत्तम सोयी देणारे आरोग्य केंद्र् म्हणून हे नावारूपास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकातून नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनी तेलंगखेडी प्राथमिक केंद्राच्या निर्माणाचा प्रवास सांगितला. सुदामपुरी आणि परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळविण्यासाठी बरेच दूर जावे लागत होते. माजी नगरसेवकाच्या निधीतून बनलेल्या वास्तूचा उपयोग चांगल्या कार्याकरिता व्हावा, या हेतूने येथे आरोग्य केंद्राचा प्रस्ताव आपण टाकला. डॉ. विजय जोशी यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून त्याला मूर्त स्वरूप दिले. आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयी चांगल्या असल्या की समाजाचा विकास होतो. हेच हेरून निर्माण केलेल्या आरोग्य केंद्राची स्वच्छता आणि देखभाल ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य अधिकारी डॉ. सरीता कामदार यांनी दवाखान्यात उपलब्ध सोयी-सुविधांबाबत माहिती दिली. आरोग्य समन्वयक दीपाली नागरे यांनी आरोग्य सोयींव्यतिरिक्त येथे राबविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली. तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार यांनी फीत कापून प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण केले. कार्यक्रमाचे संचालन सविता रेलकर यांनी केले. आभार अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांनी मानले.

प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणार या सुविधा
तेलंगखेडी आदर्श नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत सुरू असेल. सर्व वयोगटातील नागरिकांच्या तपासण्या या आरोग्य केंद्रात होतील. गरोदर मातांची संपूर्ण तपासणी निःशुल्क करण्यात येईल. सामान्य रुग्णांकरिता तपासणी शुल्क केवळ १० रुपये राहील. लहान बालकांना आठवड्यातून दोन दिवस लसीकरण करण्यात येईल. सुमारे ५० प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात येईल. युवक वर्गासाठी समुपदेशन, योगाविषयक मार्गदर्शन, राष्ट्रीय आरोग्य योजनांची अंमलबजावणी, मोफत स्वाईन फ्ल्यू लस, आहारविषयक मार्गदर्शन आदीं सोयी येथे राहतील.